पावसाअभावी पेरणीची कामे खोळंबली, शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2023

पावसाअभावी पेरणीची कामे खोळंबली, शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट



 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

     चंदगड तालुक्यात पावसाअभावी पेरणीची कामे खोळंबली असून पूर्वभागातील शेतकरी द्विधा मन : स्थितीत सापडले आहेत. पूर्व भागातील किणी - कर्यात भागातील कोवाड, कुदनूर, राजगोळी, होसुर, तेऊरवाडी, म्हाळेवाडी, मलतवाडी, शिवनगे, माणगांव आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर धूळवाफ पेरणी केली जाते. 

       पूर्व भागामध्ये एप्रिल - मे महिन्यात म्हणावे तसे बळिवाचे पाऊस झाले नाहीत. त्यामुळे पूर्व मशागतीची कामेही व्यवस्थित झाली नाहीत. अशातच आता पाऊस लांबत चालल्याने पेरणी करायची की नाही, तसेच पेरणी केल्यास भात उगवेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग पूर्णतः द्विधा मनःस्थितीत सापडला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिका आहेत अशा काही शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र विहिरींनीही तळ गाठला असल्याने शेतीला पाणी सोडणे शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. तर निम्म्याहून जास्त शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूनच्या आगमनाबाबत वेधशाळेने महाराष्ट्र व गोव्यापर्यंत मजल मारल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात गोंधळाचे बातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी तुरळक पाऊस बगळता येथे पाऊस झालेला नाही. त्यामुळे मान्सून दाखल झालेला आहे की वेधशाळेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे, असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

        चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेधशाळेने नेमका मान्सून पाऊस केव्हा दाखल होणार आहे याची अचूक माहिती सांगावी, अशी मागणी होऊ लागली आहे. पूर्व भागातील विहिरींनी व कूपललिकानी सध्या तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला व उसाला पाणी सोडणे कठीण होऊन बसले आहे. थुळवाप करण्यासाठी शेतकरी वर्गात वापरलेले बियाणे व खत वाया गेल्याने शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट  निर्माण झाले आहे .त्यामुळे दुबार पेरणीसाठी खते व बियाणे पुरवण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments:

Post a Comment