"कोणी पाण्याची टाकी देता का टाकी....!" महिलांचा चंदगड पंचायत समितीवर मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2023

"कोणी पाण्याची टाकी देता का टाकी....!" महिलांचा चंदगड पंचायत समितीवर मोर्चा

 

खालसा सावर्डेच्या महिलांनी चंदगड पंचायत समितीवर पाण्याच्या टाकीसाठी मोर्चा काढला.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

   आरसीसी पाण्याच्या टाकीच्या मागणीसाठी खालसा सावर्डे (ता. चंदगड) येथील महिलांनी आज चंदगड पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाला मोर्चाने निवेदन दिले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.

      चंदगड तालुक्यात हेरे नजीक कोळिंद्रे खालसा, सावर्डे खालसा, शिप्पूर या तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे.  ग्रामपंचायत साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. तथापि सावर्डे खालसा गावासाठी नियोजित आराखड्यात पाण्याच्या टाकीचा समावेशच नाही. सध्या उपलब्ध बैठी पाण्याची टाकी २५ हजार लिटरची व अपुरी आहे. यात विविध प्रकारची घाण कचरा येऊन पडत असल्याने या टाकीतील पाणी कोणीही  पीत नाही. तसेच टाकी गावापासून दूर असल्यामुळे यातून पाणीपुरवठाही सुरळीत होऊ शकत नाही. त्यामुळे नियोजित आराखड्यात बदल करून ७५ हजार लिटरची कॉलम वरील नवी आरसीसी पाणी टाकी बांधावी. या मागणीसाठी गावातील सुमारे ५०-६० महिलांनी उपसरपंच पांडुरंग चंद्रकांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली चंदगड पंचायत समिती पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी कांबळे यांना १६५ ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर उपसरपंच पांडुरंग पाटील, नागोजी पाटील व महिलांनी माध्यमांसमोर पाण्यासंदर्भातील व्यथा मांडल्या. कांबळे यांनी पाण्याच्या आरसीसी टाकी साठी आराखड्यात बदल करून याची पूर्तता करू, असे ठोस आश्वासन दिल्याचे मोर्चेकऱ्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment