तिलारी, पारगड, आंबोली प्रति महाबळेश्वर करण्याच्या घोषणा हवेतच, सार्वजनिक बांधकाम, वन विभागामुळे विकास खुंटला...! पारगड ग्रामस्थांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2023

तिलारी, पारगड, आंबोली प्रति महाबळेश्वर करण्याच्या घोषणा हवेतच, सार्वजनिक बांधकाम, वन विभागामुळे विकास खुंटला...! पारगड ग्रामस्थांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

निवेदन देताना रघुवीर शेलार व  पारगड ग्रामस्थ

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन स्थळ म्हणून घोषित असून सुद्धा ऐतिहासिक किल्ले पारगड परिसराचा विकास वन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आडमुठेपणामुळे खुंटला आहे. असा १७ लेखी पुराव्यांनिशी आरोप करत आरोग्य, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या पारगड, मिरवेल, नामखोल च्या विकास कामांना गती द्यावी अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, वनमंत्री, सार्व. बांधकाम मंत्री, पालकमंत्री व उद्योग मंत्री यांना ग्रामस्थांनी दिले आहे.

        कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीवर वसलेला शिवकालीन किल्ले पारगड व परिसर अनेक वर्षांपासून रस्ते, पाणी, आरोग्य आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पारगड मोरले 'राजमार्ग १८७' कोल्हापूर, बेळगाव परिसराला गोव्याशी जोडणारा घाट मार्ग विरहित, सर्वात जवळचा व सुलभ मार्ग असूनही लोकप्रतिनिधी व शासनाच्या इच्छाशक्तीअभावी तर अधिकारी व ठेकेदाराच्या बेजबाबदार पणामुळे ३ वर्षे रखडला आहे. या प्रश्नी झालेल्या आमरण उपोषण आंदोलनावेळी लेखी आश्वासने देऊन वेळ मारून नेली जाते. 

      आंबोली, चौकुळ, पारगड किल्ला व तिलारी परिसर प्रति महाबळेश्वर म्हणून विकसित करण्याच्या गप्पा कागदावरच राहिल्या आहेत. कुंबरी प्रश्नी वन हक्क संदर्भात नियम ५ व ६ नुसार दावे करून ४ वर्षे झाली तरी हे प्रस्ताव प्रशासनाकडे धूळ खात पडले आहेत. पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत कडील पाणी व रस्ता प्रश्नी गेली पाच वर्षे आंदोलने होत असताना दोन्ही प्रश्न रेंगाळले आहेत. एकंदरीत कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरातील गावांच्या विकासासाठी अग्रक्रम द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनासोबत शिवकालीन व ब्रिटिश कालीन सनदा व मिळणाऱ्या मानधनाचे पुरावे, पुरातन विभागाचे पत्रव्यवहार, सन १६७४ ची किल्ले वासियांची वतन यादी, परिसरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झालेली २९ उपोषणे व त्या त्या वेळी 'वेळ मारून नेण्यासाठी' मिळालेली वांझोटी लेखी आश्वासने, पारगड नकाशा, वनमंत्र्यांची पत्रे, वहिवाट असलेले सन १९३४ पर्यंतचे सातबारा उतारे आदी १७ महत्त्वपूर्ण पुरावे जोडले आहेत. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह विविध खात्याच्या सर्व मंत्र्यांना नुकतेच देण्यात आले आहे. यावर मंत्री महोदय काय भूमिका घेतात याकडे पारगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:

Post a Comment