होस्टेलमध्ये घुसला ५ फुटी नाग, विद्यार्थ्यांत घबराट, तुर्केवाडीतील घरातही पकडला ७ फुटी नाग - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2023

होस्टेलमध्ये घुसला ५ फुटी नाग, विद्यार्थ्यांत घबराट, तुर्केवाडीतील घरातही पकडला ७ फुटी नाग

 

तुर्केवाडी येथे वैजू गावडे यांच्या घरात पकडलेला ७ फुटी नाग दाखवताना सदाशिव पाटील, 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील आयटीआय कॉलेजच्या विद्यार्थी वस्तीगृहात ५ फुटी नाग घुसला. विद्यार्थी राहत असलेल्या खोलीत रात्री दहाच्या सुमारास हा जहाल विषारी नाग वळवळत आत येताना पाहताच विद्यार्थ्यांची घबराट उडाली. यावेळी प्रसंगावधान राखून कोणीतरी मामासाहेब लाड विद्यालय व जुनियर कॉलेज ढोलगरवाडी येथील प्रा. सदाशिव पाटील यांना मोबाईल वरून याबाबतची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी रात्री अकरा वाजता येऊन या नागाला पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर सापाच्या दहशतीखालील विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.

पाटणे फाटा येथे होस्टेलमध्ये घुसलेला विषारी नाग पकडल्यानंतर सदाशिव पाटील विद्यार्थी व इतर.

         दुसऱ्या एका घटनेत तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील बंगल्याच्या माळाच्या शेतात असलेल्या वैजू अन्नू गावडे यांच्या घरातही ७ फूट लांबीच्या नागाने आसरा घेतला होता. येथेही सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी माहिती मिळताच धाव घेऊन सापाला पकडून ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत सर्पमित्र रोहित पाटील तसेच तुर्केवाडी येथील अनुप गावडे, मनोज गावडे, अक्षय भडाचे, सुरज गावडे, सौरभ पाटील हे तरुण उपस्थित होते. दोन्ही सापांना पकडून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. 

सर्पमित्र रोहित पाटील

                  दोन्ही ठिकाणी विद्यार्थी व ग्रामस्थांना सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील यांनी सर्प हा आपला शत्रू नसून मित्र आहे. त्याच्याबद्दलची अधिक माहिती घ्या. गैरसमजातून व सापाला घाबरून त्यांची नाहक हत्या करू नका. तो पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. अशा आशयाचे मार्गदर्शन केले. प्रा. पाटील यांच्या या  सामाजिक कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.No comments:

Post a Comment