रानडुकरांच्या कळपाचा धुमाकूळ, ऊस पिकांचे नुकसान, घुल्लेवाडीतील शेतकरी त्रस्त..! बंदोबस्त करण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2023

रानडुकरांच्या कळपाचा धुमाकूळ, ऊस पिकांचे नुकसान, घुल्लेवाडीतील शेतकरी त्रस्त..! बंदोबस्त करण्याची मागणी

घुल्लेवाडी येथील बबन तुकाराम पाटील यांच्या ऊस शेतीचे रानडुकरांनी केलेले नुकसान.


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        घुल्लेवाडी (ता. चंदगड) येथील शिवारातील ऊस पिकात  रानडुकरांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. घुल्लेवाडी गावाच्या पूर्वेकडे नदी काठ परिसरातील तांबाळ नावाच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून या डुकरांचा वावर सुरू आहे. 

      या परिसरातील बबन तुकाराम पाटील, पुंडलिक सुबराव पाटील आदी शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खाऊन तसेच मोडतोड करून मोठे नुकसान चालवले आहे. चंदगड वन विभागाने या डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी घुल्लेवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 

         या शिवारालगत कोणताही जंगल परिसर नसतानाही डुकरांनी घातलेला धुडगूस पाहून शेतकरी वर्गातून आश्चर्य व्यक्त होत आहे. या शिवारालगतच निट्टूर व म्हाळेवाडी गावचा शिवार असून हा डुकरांचा कळप आपला मोर्चा केव्हाही इकडे वळवू शकतो. एकंदरीत या रानडुकरांच्या कळपामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून  वन विभागाने यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील, तालुका सरचिटणीस तुकाराम पाटील व शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment