कोवाड येथील एसटी कॅन्टीन चालक व वर्तमानपत्र विक्रेते बाबुराव व्हन्याळकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2023

कोवाड येथील एसटी कॅन्टीन चालक व वर्तमानपत्र विक्रेते बाबुराव व्हन्याळकर यांचे निधन


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील रहिवाशी व ताम्रपर्णी नदीपलीकडील एसटी स्टँड कॅन्टीन चे चालक व वृत्तपत्र विक्रेते बाबुराव मुकुंद व्हन्याळकर (वय ८५) यांचे दि. ३० जुलै २०२३ रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

    ज्या काळात गॅस, स्टोव्ह, विज, रस्ते अशा सुविधांचा मागमूस नव्हता, चुकून कधीतरी धुळ्ळा उडवत येणारी एसटी किंवा शासकीय जीप सोडली तर दुसरे कोणतेही वाहन रस्त्यावर दिसत नव्हते, अशा काळात म्हणजे ५० वर्षांपूर्वी पासून कोवाड येथे ताम्रपर्णी नदीपलीकडील एसटी स्टॅन्ड मधील कॅन्टीन बाबुराव व्हन्याळकर चालवायचे. बससाठी थांबलेल्या प्रवाशांना किमान चहा तरी मिळावा यासाठी पहाटे ६ ते रात्री ९ पर्यंत त्यांची कॅन्टीन मधील चुल लाकडांवर पेटत राहायची. कर्यात भागातील ३०-४० गावांत कुठेही वर्तमानपत्र येत नव्हतं त्यावेळी बाबुराव च्या कॅन्टीनमध्ये सर्व वृत्तपत्र विक्रीला ठेवलेली असायची. भागातील अनेक वाचक चालत, सायकलने जाऊन तिथून वर्तमानपत्रे घरी आणून वाचत. आम्हा विविध वृत्तपत्रांच्या पत्रकारांनाही ते ही बातमी आली पाहिजे, ती बातमी आली पाहिजे अशा सूचना हक्काने करायचे. 

    अनेक वर्षे त्यांनी कॅन्टीन चालवत कोवाड गावात ८० वर्षे वयापर्यंत घरोघरी वृत्तपत्रे टाकून सेवा दिली. नियमित वाचक सकाळी पेपर साठी 'बाबुमा'च्या वाटेकडे डोळे लावून असायचे. प्रवाशांच्या सेवेसाठीही ते नेहमी तत्पर होते. एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुनसान स्टँडवर ते आधार वाटायचे. वृत्तपत्रांच्या नियमित वाचकांशी ते कमालीचे आदराने बोलायचे. पावसाळयात पुरामुळे अडकून थांबलेल्या प्रवाशांनाही त्यांचा आधार होता. ५० वर्षे एसटी चे कँन्टीन प्रामाणिकपणे चालवल्यानंतर त्यांनी सर्व कामांतून २०१५ पासून निवृत्ती घेतली होती. गेले काही दिवस आजारी होते. देश-दुनियाची खबर वर्तमान पत्राद्वारे प्रत्येक घरा-घरात पोहचवणाऱ्या, कॅन्टीच्या माध्यमातून अर्धशतकीय सेवा देत प्रवासी व वाचकांच्या मनात घर केलेल्या बाबू मामांनी सर्व मित्रांना आज अखेरचा नमस्कार केला. त्यांच्या स्टॅन्डवरील कॅन्टीनमध्ये एकदा तरी येऊन गेलेले प्रवासी, वर्तमानपत्र वाचक त्यांचे चाहते झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे जुन्या आठवणी जाग्या होऊन या हजारो चाहत्यांचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाहीत. 

  बाबुराव व्हन्याळकर यांच्या पश्चात पत्नी, विवाहित चार मुली, दोन मुलगे, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.No comments:

Post a Comment