लाकुरवाडीच्या शेतकऱ्याने घेतले ६ गुंठ्यात २ लाख ४० हजाराचे मिरची उत्पन्न, शिक्षणाने केले कर्जबाजारी, शेतीने दिला मदतीचा हात - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2023

लाकुरवाडीच्या शेतकऱ्याने घेतले ६ गुंठ्यात २ लाख ४० हजाराचे मिरची उत्पन्न, शिक्षणाने केले कर्जबाजारी, शेतीने दिला मदतीचा हात

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 
         लाकुरवाडी (ता. चंदगड) येथील तानाजी बाळू दळवी या तरुण सुशिक्षित शेतकऱ्याने फक्त ६ गुंठ्यात मिरची लागवड करून तब्बल २ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले. खर्च वजा जाता १ लाख ८५ हजारांचा नफा मिळवून जुन्या पद्धतीने  शेती करून कर्जबाजारी होणाऱ्या शेतकऱ्यांना एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 
          चंदगड तालुक्यातील शेतकरी सर्रास ऊस पिकासहा इतर पिकांचे उत्पादन घेत असतो. पारंपारिक जुनाट पद्धतीने पिकांचे उत्पादन घेत असताना वाढलेल्या महागाईत पिकांचे उत्पादन व त्यातून मिळणारा नफा याचा ताळमेळ बसेनासा झाला. परिणामी शेतकरी कर्ज बाजारी राहीला आहे. मात्र यावर लाकूरवाडी येथील सागर दळवी या तरुण सुशिक्षित शेतकर्याने आधुनिक पद्धतीने मिरची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवला आहे. काबाडकष्ट करूनही कमी नफा मिळवणाऱ्या  शेतकऱ्यांना आदर्श घेण्यासारखा आहे.

    चंदगड तालुक्यात खडकाळ व उंच टेकडीवर वसलेल्या गावापैकी लाकूरवाडी हे एक गाव. याच गावातील तानाजी दळवी या तरुणाने बी. ए. बी. पी. एड पर्यंत शिक्षण घेऊन नोकरीसाठी वनवन भटकला. दोन चार ठिकाणी तुटपुंज्या पगारावर नोकरीही केली. पण त्यात स्वत: सह कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने वडिलांसोबत स्वत:च्या शेतात राबण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा गावाशेजारी असलेल्या सहा गुंठे क्षेत्रात ५५३१ व नेत्रा या मिरची रोपांची लागवड केली. सुरवातीपासून ठराविक कालावधीत युरिया, डी ए पी,टाॅनिक, कीटकनाशक, १०.२६.२६ आदी खताचा डोस व फवारणी केली. मिरचीच्या प्रत्येक तोड्याला वेगवेगळ्या कीटकनाशक व टाॅनिक ची फवारणी केली. शिवाय शेतात तीन ठिकाणी किड प्रतिबंधक सापळे तयार करून किडीचा बंदोबस्त केला. याचा परिणाम उत्पादन वाढीसाठी झाला.
       मिरची तोड्यानंतर मार्केटमध्ये दोन्ही प्रकारच्या मिरचीला चांगला भाव मिळाला. सहा गुंठ्यात एकूण दोन लाख चाळीस हजारांचे एकूण उत्पादन मिळाले.लाईट, मशागत, माणसांची मजूरी, खते, बियाणे आदीसाठी एकूण पंच्चावन्न हजार रूपये खर्च आला असुन एकूण खर्च वजा जाता चार महिन्यांत  एक लाख पंच्याऐंशी हजाराचा निव्वळ नफा झाला. ऊस पिकाचा विचार करता सहा गुंठ्यात वर्षभरात गुंठ्याला दोन टन उस  उत्पादन धरल्यास बारा टन ऊस येतो. बारा टनाचे बाजारभावाप्रमाणे छत्तीस हजार रूपये उत्पादन मिळाले असते. खर्च वजा केल्यास हाती काहीच उरले नसते. त्यामुळे ऊस पिकाच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी भाजीपाला व मिरची लागवडी कडे शेतकऱ्यांनी वळावे असा सल्ला तानाजी दळवी यांनी आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांना दिला आहे. तर वाढत्या महागाईंत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करून व कृषी विभागाच्या सल्याने शेती केल्यास चार पैसे शेतकऱ्यांच्या हाती येणार आहेत. या मिरची लागवडीसाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री. साबळे व कृषी मित्र राजेश नौकूडकर (मांडेदूर्ग) यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही श्री. दळवी यांनी सांगितले.

1 comment:

जोशी गुरुजी said...

भावा तुझं अभिनंदन. तू चंदगड तालुक्याचा दीपस्तंभ ठरावास हीच अपेक्षा.

Post a Comment