अखेर बहुचर्चित झांबरे प्रकल्पातून वीजनिर्मिती सूरू - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2023

अखेर बहुचर्चित झांबरे प्रकल्पातून वीजनिर्मिती सूरू

 



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    बहुचर्चित झांबरे प्रकल्पातून कालपासून वीजनिर्मिती करण्यास सुरुवात झाल्याने पुराचा धोका काही प्रमाणात कमी होणार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते संदीप आर्दाळकर यांनी व्यक्त केले.

संदिप आर्दाळकर

       २०१९ साली कोवाड, चंदगड तसेच ताम्रपर्णी नदीकाठावरील अनेक गावामध्ये महापुराने हाहाकार माजवला अनेक शेतकऱ्यांचे संसार उघडय़ावर पडले. शेतीचे तर प्रचंड नुकसान झाले त्यावेळी महापुराने मागील सर्व रेकार्ड तोडले. पाऊस तर जोरदार होताच पण यामागे काहीतरी मानव निर्मित कारण आहे अशी खात्री होती त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही जांबरे प्रकल्पावर पोहचलो. त्याची रचना पाहिली तर या प्रकल्पावर पावसाळ्यामध्ये पाणी सोडून पाणी पातळी नियंत्रीत करण्यासाठी कोणतीही व्यवस्था [दरवाजा] नाही हे लक्षात आले. 

          त्यानंतर प्रकल्पाच्या पायत्याशी बांधलेले १ शेड दिसले त्याची चौकशी केली असता हे शेड पॉवर हाऊसचे होते. पण शेड सोडून या ठिकाणी काहीही नव्हते. त्यावेळी या प्रकल्पातून विजनिर्मिती होईल व शासनास‌ महसूल मिळेल व तालुक्याची विजेची टंचाई दूर होईल तसेच विज निर्मितीसाठी प्रकल्पातून पाणी सोडल्यास प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रीत राहील व महापुराचा धोका बऱ्याच अंशी कमी होईल या दृष्टीकोनातून मी प्रयत्न सूरू केले.

     यासाठी पाटबंधारे कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरु केला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून माहिती घेतल्यावर याबाबत शासनदरबारी पत्रव्यवहार सुरूच ठेवला तेथूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर माझ्या प्रकल्पावर पाहणीसाठी फेर्‍या वाढल्या या दरम्यान हा प्रकल्प कोल्हापूर येथील संजय. बी.पाटील कंपनीने बी. ओ.टी तत्वावर घेतल्याचे समजले त्यानंतर या प्रकल्पाचे व्यवस्थापक अभियंता अमर ईनामदार यांच्या माध्यमातुन प्रकल्पाची माहिती घेतली.व प्रकल्प लवकर करण्यासंदर्भात त्यांच्या बरोबर चर्चा केली. त्यांना काही शासकीय पातळीवर अडचण आल्यास त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना मार्ग काढून दिला. तसेच शासनदरबारी यासंदर्भात सतत पाठपुरावा केला. अखेर आता- प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रकल्प कार्यान्वशीत झाला आहे. सतत चार वर्षे पाठपुरावा करून सदर प्रकल्प मार्गी लागला याचे समाधान आहे.

           तसेच सदर प्रकल्प सुरु झाल्यामुळे सांडव्यावरून वाया जाणाऱ्या पाण्यापासून वीजनिर्मिती सुरू झाली व वीजनिर्मीतीमधून शासनाला महसूल मिळत आहे तसेच तालुक्यातील वीजटंचाईवर मात करता येईल सगळ्यात महत्त्वाचा विषय महापूर यावर पण मोठ्या प्रमाणावर मात करता येईल. झांबरे प्रकल्पाचे पाणी वीजनिर्माती साठी वापर केल्यामुळे प्रकल्पातील पाणी साठा नियंत्रीत राहील व मोठ्या पावसामध्ये सांडव्यावरून कोसळणार्या पाण्याची पातळी नियंत्रीत राहील व महापूर नियंत्रणात राहील. यामुळे कोवाड, चंदगड ही बाजारपेठेची गावे सुरक्षीत होतील तसेच नदीकाठावरील अनेक गावांतील शेतीची होणारी हानी कमी प्रमाणात होईल याचबरोबर कर्नाटकमधील हिडकल प्रकल्पाची ५१ टीएमसी साठवण क्षमता आहे. हा प्रकल्प भरताना टप्या-टप्याने भरणे, ३० सप्टेंबरपर्यंत १००% भरणे, मोठया पावसात विसर्ग वाढविणे याबाबत चंदगडच्या प्रशासनाने हिडकल धरण प्रशासनाशी समन्वय ठेवावा म्हणजे वरील दोन्ही गोष्टींचा महापूरावर फार मोठा फरक पडणार आहे याचा गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे.

         पॉवर हाऊस सुरु होणे, हिडकल प्रकल्पाच्या पाणी विसर्गावर लक्ष ठेवणे. ह्या प्राथमिक गोष्टी झाल्या. यामुळे ५०% महापूरावर नियंत्रण मिळवता येईल पण भविष्यामध्ये चंदगड तालुका महापूरमुक्त करायचा असेल तर खालील काही दिर्घकालीन उपाय योजना करणे गरजेचे आहे. घटप्रभा व ताम्रपर्णी दोन्ही नदी मधील गाळ व वाळू शासनाने काढावी हे शासनास शक्य नसल्यास प्रत्येक वर्षी १ बंधाऱ्यामधील वाळू व गाळाचा लिलाव करावा किंवा प्रति ब्रास प्रमाणे रॉयल्टी भरुन घ्यावी व शेतकऱ्यांना शेतामध्ये टाकण्यासाठी गाळ दयावा तर बांधकाम व्यावसाईकांना वाळू घ्यावी अशा प्रकारे वर्षात १ बंधारा गाळ मुक्त करावा अशा प्रकारे ५/६ वर्षामध्ये दोन्हीं नद्या गाळमुक्त होतील व नद्यांची वाहन क्षमता वाढेल. चंदगड तालुक्यामध्ये तीन मध्यम प्रकल्प व २१ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. त्याच्यामधील गाळ आजपर्यंत कधीही काढला नाही. आपण याचा पण विचार करणे काळाची गरज आहे कारण आपण म्हणतो हा प्रकल्प एवढा टि.एम.सी आहे. पण त्यामध्ये पाणी किती व गाळ किती याचा आपण कधी विचार करत नाही याबाबत शासनाने निधी देवून धरण गाळमुक्त व शिवार गाळयुक्त करणे गरजेचे आहे. या उपाययोजना मुळे महापूरावर मोठ्या प्रमाणात मात करता येईल यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांची इच्छाशक्ती हवी तरच तालुका महापूर मुक्त होईल व शेतकरी सुखी समाधानी होईल याचा गांभीर्याने विचार करून सुयोग्य निर्णय घ्यावा असे मत सामाजिक कार्यकर्ते श्री. आर्दाळकर यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment