कालकुंद्री- किटवाड रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य...! ग्रामस्थांसाठी बिकट वाट, पर्यटकांची कुचंबना - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2023

कालकुंद्री- किटवाड रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य...! ग्रामस्थांसाठी बिकट वाट, पर्यटकांची कुचंबना

 

कालकुंद्री- किटवाड रस्त्याची चिखलामुळे झालेली दयनीय अवस्था

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कालकुंद्री ते किटवाड हा ४ किमी लांबीच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पर्यटक व ग्रामस्थ यातून 'वाट' शोधताना हतबल झालेले दिसत आहेत. तीस वर्षांपूर्वी जिल्हा मार्गाचा दर्जा मिळालेल्या कोवाड, कालकुंद्री ते किटवाड रस्ता प्रश्नी गेल्या तीन- चार वर्षात तीन खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषद सदस्य, जिप. बांधकाम विभाग, पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालय आदींना निवेदने देऊनही ग्रामस्थांच्या पदरी निराशाच पडली आहे.

        शिवसेना शासन काळात १९९५ मध्ये कृष्णा खोरे विकास योजनेतून किटवाड नजीक झालेले दोन लघु पाटबंधारे प्रकल्प, यातील धरण क्र. १ च्या सांडव्यातून निर्माण झालेला धबधबा व निसर्गरम्य परिसरामुळे गेल्या काही वर्षात चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव, हुक्केरी तालुक्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. येथील धबधबा कालकुंद्री गावाच्या हद्दीत असल्यामुळे इकडून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. तथापि  रस्त्याची अवस्था पाहून दूरवरून येणाऱ्या पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे. 

      कोवाड, कालकुंद्री ते किटवाड एकूण अंतर ६ ते ७ किमी असून या रस्त्यालगत असणाऱ्या तिन्ही गावच्या शेतकऱ्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी लागणारी जमीन विना मोबदला देणे बाबत संबंधीत विभागाकडे दोन वर्षांपूर्वीच ना हरकत प्रतिज्ञापत्रे सादर करून रस्ता रुंदीकरणासह खडीकरण व डांबरीकरण करावा, तसेच कोवाड कालकुंद्री दरम्यान ताम्रपर्णी नदीवर व किटवाड धरणालगत ओढ्यावर पूल बांधावा अशी मागणी केली आहे. शंकर मुर्डेकर, गुरुनाथ पाटील, तानाजी पांडुरंग पाटील, शंकर सांबरेकर, शंकर कोले आदींच्या शिष्टमंडळाने खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील व बांधकाम विभागांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. 

         तथापि या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे स्पष्ट झाले आहे. या रस्त्यापैकी केवळ १ किमी लांबीचा टप्पा १० वर्षांपूर्वी खडीकरण व डांबरीकरण केला होता. त्या डांबराचा सध्या मागणी दिसत नाही. त्याच्यावरही सध्या गुडघाभर चिखल झाला आहे. उर्वरित भागाने तर तीस वर्षात एकदाही खडी पाहिलेली नाही. रस्त्याची ही स्थिती अशीच राहिल्यास पुढील वर्षी  उन्हाळी वाहतूक सुद्धा बंद होण्याची नामुष्की येऊ शकते. सध्या वर्तमानपत्रातून या रस्त्याला निधी मंजूर झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

  चंदगडच्या पूर्व भागातील हा महत्त्वाचा रस्ता असून कोवाड पासून बेळगाव ला जाणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून ब्रिटिश काळापासून या रस्त्याकडे पाहिले जाते. एकंदरीत ग्रामस्थांच्या या मागणीचा आदर करून रस्ता काम तात्काळ हाती घ्यावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment