मौजे कारवे येथील नाटय दिग्दर्शक द. य. कांबळे (गुरुजी) काळाच्या पडद्याआड - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2025

मौजे कारवे येथील नाटय दिग्दर्शक द. य. कांबळे (गुरुजी) काळाच्या पडद्याआड

 

द. य. कांबळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        मौजे कारवे (ता. चंदगड) येथील रहिवाशी, सुप्रसिद्ध लेखक, नाटय दिग्दर्शक द. य. कांबळे (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे दुःखद निधन झाले.

    ते सेवानिवृत्त प्राथमिक  शिक्षक आणि मुख्याध्यापक, विविध सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांचे 'काचेचं स्वप्न', 'खडकातली हिरवळ', 'अतुट धागा' हे कथासंग्रह आणि 'अंधारी मी उभी आंधळी' हे नाटक लोकप्रिय ठरले आहे. 

      त्यांनी कविता, गीतरचना, कथा, नाटिका, नाटक, नाटयछटा, एकांकिका, भारूड इ. साहित्य प्रकारात लेखन केले होते. अभिनय, संगीत, दिग्दर्शन, लळित भजन, चित्रकला, मूर्तीकला, उत्तम वक्ते, कथाकथन, सूत्रसंचालन अशा सर्वच क्षेत्रात मुशाफिरी केली होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. नाटय दिग्दर्शक म्हणून चंदगड तालुक्यातील हौशी रंगभूमीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. 

       मौजे कार्वे (ता. चंदगड) येथील सरस्वती वाचनालयाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. वाचनालयाच्या वतीने तालुक्यातील अनेक कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करण्याची त्यांनी परंपरा जोपासली होती. वाचनालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून तालुक्यात वाचन संस्कृती रुजविण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांना आदर्श कला शिक्षक, विविध साहित्य पुरस्कार आणि आदर्श वाचनालय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 

      त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रा. (डॉ.) प्रदीप कांबळे, विवाहित मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment