शिक्षणाला प्रत्यक्ष जीवन व्यवहाराची जोड असावी - युवराज छत्रपती संभाजीराजे, चंदगड येथे माडखोलकर महाविद्यालयाचा वर्धापनदिन कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2023

शिक्षणाला प्रत्यक्ष जीवन व्यवहाराची जोड असावी - युवराज छत्रपती संभाजीराजे, चंदगड येथे माडखोलकर महाविद्यालयाचा वर्धापनदिन कार्यक्रम संपन्न

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना युवराज संभाजीराजे बोलताना. व्यासपीठावर मान्यवर. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         "शिक्षणाचा नेमका अर्थ लक्षात घ्यायला हवा. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षा आधीच सांगून ठेवले आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी निव्वळ पुस्तकी शिक्षणावर भर देऊ नये, तर शिक्षणाला प्रत्यक्ष जीवन व्यवहाराची जोड असावी. आपल्या आवडीनिवडी, क्षमता ,कल यांचा विचार करून प्रत्येकाने प्राविण्य संपादन करावे. ध्येयनिश्चित करावे. त्याच्या पूर्ततेसाठी योजनाबद्ध प्रयत्न करावेत आणि आपली स्वप्ने, आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत व कष्ट घेण्याची तयारी ठेवावी. शिक्षण हे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे." असे प्रतिपादन युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले. ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.  अध्यक्षस्थानी ॲड. एस.  आर. पाटील हे होते. 

       अध्यक्ष स्थानावरून बोलताना ॲड. पाटील यांनी ``आजच्या युवकांनी छत्रपतींच्या ओजस्वी भाषणाचा संदेश ध्यानात घेऊन गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करावे. तसेच आत्मचिंतन करून ज्ञानाचा समाजाच्या विकासासाठी उपयोग करावा असे मत व्यक्त केले.

       माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी ``महाविद्यालयाच्या मान्यता व मंजुरीचे काम करता आले, याचा अभिमान वाटतो. कारण त्यामुळेच दुर्गम भागातील मुला-मुलींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होऊ शकले असे सांगितले. यावेळी प्रारंभी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. श्रीपती कांबळे यांनी पोवाडा सादर केला. विश्राम कांबळे यांनी आपल्या तुतारीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

       प्रास्ताविकातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी नॅक मुल्यांकनात महाविद्यालयाने चढत्या श्रेणीमध्ये यश प्राप्त केले असून कला, क्रीडा ,सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाचा परामर्श घेतला. सांस्कृतिक विभाग प्रमुख ए. डी. कांबळे यांनी आभार मानले. सुत्रसंचालन डॉ. एन. एस. मासाळ यांनी केले.

       यावेळी नवागत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रियांका निटुरकर, डॉ. एस. एन. पाटील व प्रा. सुर्यकांत गावडे, डॉ. एस. डी. गोरल यांचाही सत्कार करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच गुणी विद्यार्थी व खेळाडू यांचाही सन्मान करण्यात आला. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

        याप्रसंगी मराठा महासंघाचे सुरेश सातवणेकर, राजू सुकये, विजय देसाई, कमलाकर सावंत यांनी छत्रपतींचा सन्मान केला. व्यासपीठावर स्वराज्य पक्षाचे संजय पवार, आर. पी. पाटील, ज. गा. पाटील, अशोक पाटील, एल. डी. कांबळे, आर. पी. बांदिवडेकर, डॉ. एस. पी. बांदिवडेकर, मारुती पाटील, एम. एम. तुपारे उपस्थित होते. कार्यक्रमाला नितीन नेसरीकर, प्रवीण वाटंगी, अनिकेत घाडगे, आर. आय. पाटील, एस. व्ही.  गुरबे, मारुती गावडे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment