कोवाड येथील पाककृती स्पर्धेत अमृता कांबळे प्रथम, ९३ महिलांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2023

कोवाड येथील पाककृती स्पर्धेत अमृता कांबळे प्रथम, ९३ महिलांचा सहभाग

 

कोवाड येथे पाककृती स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के. कांबळे सोबत केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

     प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) येथे दि. १४/०९/२०२३ रोजी 'पाककृती स्पर्धा' आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाडचे वैद्यकीय अधिकारी बी के कांबळे यांच्या हस्ते झाले. स्वागत मधुमती गावस, भावना अतवाडकर, जयमाला पाटील यांनी केले. प्रास्ताविक गणपती लोहार यांनी केले. 

       सन २०२३ हे वर्ष महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. याची अंमलबजावणी म्हणून तांदूळ, नाचना, वरी, गहू, मका, ज्वारी, बाजरी इत्यादी तृण अर्थात गवत वर्गीय धान्यापासून पदार्थांची (पाककृतीची) निर्मिती करून त्याचे प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या अनुषंगाने केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे शिकणाऱ्या सर्व १७५ विद्यार्थ्यांच्या मातांना स्पर्धेत सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. यात ९३ मातांनी सहभाग घेऊन तृणधान्यापासून विविध नाविन्यपूर्ण पदार्थांची निर्मिती करून प्रदर्शनात मांडले होते. यातील विजेते ठरलेले अनुक्रमे सहा स्पर्धक व त्यांनी बनवलेले पदार्थ  पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक अमृता सुधीर कांबळे (नाचणीचे उत्तप्पा, लाडू व पुरी), द्वितीय क्रमांक सौ दयश्री गुरुप्रसाद तेली (गव्हाचे थालीपीठ), तृतीय क्रमांक सौ समिया रफिक बाडकर (ज्वारीची खिचडी), चतुर्थ क्रमांक सौ अन्नपूर्णा रवींद्र हेब्बाळकर (नाचणीची आंबोळी), पाचवा क्रमांक सौ माया सुबराव सुतार (नाचणीचा शिरा), सहावा क्रमांक सौ सुजाता प्रभाकर गावडे (नाचणीचे चवदार लाडू) यांनी यश संपादन केले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यातील प्रथम क्रमांकाची निवड २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या चंदगड तालुकास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.  

      वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप पाटील, जक्कनहट्टी शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील, आरोग्य सेविका सुजाता कांबळे, रेणुका कांबळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विष्णू जोशी, भरत पाटील, संजीवनी भोगण, पूजा भोसले, लक्ष्मी सुर्वे आदींची उपस्थिती होती. अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment