पांढरे रेशन कार्ड धारकांनाही ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत...!, विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, 'चंदगड' आरोग्य विभागातील रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2023

पांढरे रेशन कार्ड धारकांनाही ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत...!, विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, 'चंदगड' आरोग्य विभागातील रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार

होसूर (ता. चंदगड) येथील आरोग्य शिबिरात बोलताना डॉ. दिलीप माने विभागीय उपसंचालक कोल्हापूर मंडळ,  डॉ. परशराम पाटील व मान्यवर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        सर्वांनी मोफत शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी शासन कटिबद्ध आहे. असे सांगताना चंदगड तालुक्यात शासकीय आरोग्य विभागातील रिक्त पदे जानेवारी अखेरपर्यंत प्राधान्याने भरणार असल्याची ग्वाही आरोग्य सेवा कोल्हापूर विभागीय उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी दिली. ते होसूर (ता. चंदगड) येथे कोल्हापूर जि. प. आरोग्य विभागातील वरिष्ठ सहाय्यक सुबराव रामचंद्र पवार यांनी आपल्या मातोश्री कै शांताबाई रा. पवार यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आरोग्य विभाग जिप. कोल्हापूर, केएलई सोसायटी बेळगाव, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर, हेल्पर्स ऑफ हॅण्डीकॅप्ड कोल्हापूर यांच्या सहकार्याने संपन्न शिबिरात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. परशराम पाटील, कृषी अर्थतज्ञ व सल्लागार भारत सरकार यांच्या हस्ते झाले.

       स्वागत सुबराव पवार यांनी केले. प्रास्ताविक संदीप शहापूरकर प्रेसिडेंट रोटरी क्लब यांनी केले. यावेळी पुढे बोलताना डॉ. माने म्हणाले, ``विकास भारत यात्रा योजनेंतर्गत देशातील नागरिकांना सर्व  आरोग्य सुविधा मोफत पुरवण्यात येत आहेत. प्रत्येक नागरिकांने किमान तीन महिन्यातून एकदा आपल्या आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात. यापूर्वी आयुष्मान भारत कार्ड २०११ च्या सर्वेनुसार पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना आरोग्य विषयक लाभ मोफत मिळत. तथापि आता पांढरे रेशन कार्ड धारकांनाही सरसकट ५ लाखांपर्यंत वैद्यकिय लाभ मोफत मिळत आहेत. यासाठी देशातील पाच वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने 'आभा' कार्ड काढून घेणे गरजेचे आहे.`` यावेळी बोलताना डॉ. परशराम पाटील म्हणाले, ``मी चंदगड तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातून दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलो असल्याने ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या मला माहीत आहेत. ज्या देशाचे आरोग्य चांगले असेल तोच देश सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती करू शकतो. त्यामुळे शासनाने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात प्राधान्याने आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी सूचना केली.``

        या  सर्वरोग निदान व उपचार शिबिराचा  ६५० रुग्णांनी लाभ घेतला. तर ४७ जणांनी रक्तदान केले. स्त्री रोग रुग्ण- ४, डोळे तपासणी- ६८, त्वचा रोग- ९, जनरल मेडिसिन- ७२, जनरल सर्जरी-१५, अस्थी रोग (हाडांचे विकार)- ९४, ECG- ३०, HB (हिमोग्लोबिन चेक)- १७४, RBS (शुगर चेक)- १७४ अशा ६४० रुग्णांनी  लाभ घेतला. यातील ५२ रुग्णांना पुढील मोफत उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. या शिवाय  ९० गोल्डन कार्ड व ३० आभा कार्ड काढण्यात आली.

         यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, डॉ. बी. के. कांबळे,  माजी जि. प. अध्यक्षा पुष्पमाला जाधव, सरपंच राजाराम नाईक, जागर फाउंडेशन अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले, मराठा बॅंक बेळगावचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, हेल्पर्स ऑफ हॅण्डीकॅप्ड कोल्हापूरच्या सचिव रेखा देसाई, रोटरी क्लब कोल्हापूरचे डिस्ट्रिक गव्हर्नर नासिर बोरसदवाला, प्रेसिडेंट संदीप शहापूरकर, को-ऑर्डिनेटर बाळासाहेब पडळकर, मानसिंग पानसकर, सुहास शेलार, एस एल पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

      शिबिराच्या यशस्वीतेसाठी केएलई हॉस्पिटल व जे. एन. मेडिकल कॉलेज बेळगाव, आरोग्य विभाग चंदगडचे डॉक्टर व स्टाफ, आशा स्वयंसेविका व होसूर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष बेळगावकर यांनी केले. पुंडलिक रामचंद्र पवार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment