'डुक्करवाडी चे रामपूर' झाले, दुरावस्थेतील रस्त्यांची 'तकदीर' कधी बदलणार...? ग्रामस्थ, प्रवाशी व वाहनधारकांचा सवाल - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2023

'डुक्करवाडी चे रामपूर' झाले, दुरावस्थेतील रस्त्यांची 'तकदीर' कधी बदलणार...? ग्रामस्थ, प्रवाशी व वाहनधारकांचा सवाल

 

माणगाव- बागिलगे दरम्यान रामपूर गावालगत रस्त्याची झालेली दुरवस्था.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड तालुक्यातील 'डुक्करवाडी' गावाचे मागणीनुसार 'रामपूर' असे एकदाचे नामकरण झाले. पण रामपूरला जाण्यासाठी असलेल्या अनेक वर्षे दुरावस्थेतील रस्त्यांची 'तकदीर' कधी बदलणार? असा सवाल येथील रस्त्यावरून जाणारे वाहनधारक, प्रवासी व ग्रामस्थ करत आहेत.

      चंदगड तालुक्यातील तांबूळवाडी फाटा ते माणगाव मार्गावर दिड-दोन हजार लोकवस्तीचे 'डुक्करवाडी नावाचे गाव होते'. विविध कारणांनी हे नाव येथील ग्रामस्थांना 'नावडते' होते. त्यामुळे गावाचे नाव बदलण्यासाठी गेले ४५-५० वर्षे विविध माध्यमातून प्रयत्न सुरू होते. अखेर या मागणीला  याच वर्षी म्हणजे २०२३ मध्ये शासकीय आदेशाने अधिकृतपणे यश आले. यामुळे ग्रामस्थ आनंदित झाले नसतील तरच नवल. गावाच्या नावातील या बदलाच्या घोळात चंदगड तालुक्याचेच नाव 'रामपूर' असे झाल्याने  ऑनलाईन क्षेत्रात चार दिवस संभ्रमाचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तेव्हा हा विषय राज्यभर चर्चेचा झाला होता. नावातील बदलाचा विषय आता संपला आहे.

        पण सद्यस्थितीत चंदगड तालुक्यातील सर्वात खराब रस्ता कोणता? असा प्रश्न कोणी विचारला तर उत्तर एकच येते, ते म्हणजे माणगाव, रामपूर ते बागिलगे या ३ किमी रस्त्याचे. गावाच्या नावाप्रमाणेच या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाची अनेक वर्षे मागणी सुरू आहे. गेल्या ८-१० वर्षांपासून बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्गावरील तांबूळवाडी फाटा पासून रामपूर, माणगाव, कोवाड, दुंडगे, कामेवाडी ते दड्डी हा चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागाला पूर्वेकडील कर्नाटक राज्याशी जोडणारा रस्ता 'मेगा हायवे' होणार! मंजुरी मिळाली आहे, उन्हाळ्यात होणार, पावसाळा संपल्यानंतर होणार, अशा वावड्या व चर्चा ऐकायला मिळत आहेत. 

       तथापि या सुमारे ३० किमी मार्गापैकी कोवाड ते कामेवाडी १० किमी आणि माणगाव ते बागिलगे या ३ किमी टप्प्यात गेल्या १०-१२ वर्षात चिमटभरही डांबर पडलेले नाही असे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे येथून प्रवास करणारे नागरिक, वाहनधारक व ग्रामस्थ केवळ आश्वासनांच्या बुडबुड्यावर दिवस कंठताना दिसत आहेत. सध्या चंदगड तालुक्यात शेकडो कोटींचा निधी आणल्याच्या जाहिराती, पोस्टर, बॅनर झळकत आहेत. त्यातील काही निधी रामपूर व कामेवाडी या दोन्ही रस्त्यांवर पडेल, या आशेवर येथील ग्रामस्थ 'मेगा हायवे' ची स्वप्ने रंगवताना दिसत  आहेत.

No comments:

Post a Comment