सुरू असलेल्या रस्ता कामांचे माहिती फलक कामाच्या ठिकाणी तात्काळ लावा - नागरिकांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2023

सुरू असलेल्या रस्ता कामांचे माहिती फलक कामाच्या ठिकाणी तात्काळ लावा - नागरिकांची मागणी

 

बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्गाचे सुरू असलेले डांबरीकरण काम.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           सध्या बेळगाव- वेंगुर्ला राज्य मार्गावर चंदगड फाटा ते नागनवाडी दरम्यान सुमारे ३ किलोमीटर अंतरात १ कोटी रुपयांचे डांबरीकरण सुरू आहे. जाहिरात व बातम्यांमधून या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर असून यात रुंदीकरण, सुधारीकरण करणे असे दिसते. तथापि सुरू असलेले काम हे फक्त सध्याच्या रस्त्यावरच २० एम एम जाडीचे डांबरीकरण आहे. रुंदीकरणाच्या हालचाली कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे प्रवासी, नागरिक वाहनधारक यांच्यामध्ये कामाबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ठेकेदारांनी रस्ता कामाच्या ठिकाणी रस्त्यालगत कामाचे प्लॅन इस्टिमेट, बजेट रक्कम, कालावधी, ठेकेदाराचे नाव, दोष दायित्व इत्यादी सर्व माहिती दर्शक फलक लावून ही संभ्रमावस्था दूर करावी अशी मागणी होत आहे.

          या कामाव्यतिरिक्त तालुक्यात रस्ते, नळ पाणी योजना, शासकीय इमारती बांधकाम किंवा अन्य विकास कामे सुरू आहेत. अशा ठिकाणी अपवाद वगळता प्लॅन इस्टिमेट, बजेट रक्कम, कालावधी, दोष दायित्व दाखवणारे फलक कुठेच आढळत नाहीत. शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचे पैसे हे लोकांच्या विविध करातून साठलेल्या पैशातूनच दिले  जातात. त्यामुळे या पैशांचा योग्य वापर होत आहे की नाही, हे पाहण्याचा अधिकार जनतेला असल्याने असे फलक लावले जावेत. किंबहुना संबंधित बांधकाम विभागाने काम सुरू होतानाच असे फलक लावण्याची ठेकेदारांवर सक्तीच केली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment