डॉ. मधुकर जाधव यांना छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2023

डॉ. मधुकर जाधव यांना छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार जाहीर

 

प्राद्यापक डॉ. मधुकर विठोवा जाधव

चंदगड / प्रतिनिधी 

         हलकर्णी (ता.  चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विषयाचे सहयोगी प्राद्यापक डॉ. मधुकर विठोवा जाधव यांना' सरसेनापती प्रतापराव गुजर' या साहित्याकृतीला अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा विशेष राज्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी रयतेसाठी इंग्रजांविरूध्द एकाकी झुंज देऊन करवीर संस्थांनचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज अहमदनगर येथे हुतात्मा झाले. त्यांची स्मृती चिरंतर राहावी म्हणून हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. 

       या पुरस्काराचा प्रदान सोहळा सोमवार दि. २५ डिसेंबर २०२३रोजी संपन्न होत आहे. डॉ. मधुकर जाधव यांनी शिवाजी विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळावर व शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेवर काम केले आहे. संजय घोडावत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र व मानव्यशास्त्र अभ्यास मंडळावर तर सातारा इतिहास परिषदेच्या कार्यकारणीवर कार्यरत आहेत. त्यांची दोन पुस्तके व १३५ शोधनिबंध प्रकाशित आहेत. मराठ्यांची शस्त्रास्त्रे या विषयावरील शिवाजी विद्यापीठाचा लघुसंशोधन प्रकल्प करीत आहेत. ते मराठी विश्वकोष, शिवाजी विद्यापीठ बहिस्थ शिक्षण विभागासाठी लेखन करत आहेत. विविध वृत्तपत्रांत, मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित होतात.त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी विविध विषयांवर जवळपास ८५० च्या वर व्याख्याने दिली आहेत.



No comments:

Post a Comment