जरांगे पाटलांच्या वाशी येथील सभेस कोटींच्या संख्येने उपस्थित रहा, आम्ही येतोय तुम्हीही या..! चंदगड तालुक्यातून हाक - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2024

जरांगे पाटलांच्या वाशी येथील सभेस कोटींच्या संख्येने उपस्थित रहा, आम्ही येतोय तुम्हीही या..! चंदगड तालुक्यातून हाक

 

पदयात्रा मार्गावर जरांगे पाटील यांना मराठा बांधवांचा मिळत असलेला भूतपूर्व पाठिंबा, पदयात्रेत सहभागी लाखो मराठा बांधव.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण मिळवायचेच या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील २६ जानेवारी रोजी मुंबई येथे उपोषणास बसणार आहेत. उपोषण स्थळी जाण्यासाठी त्यांची पदयात्रा २० जानेवारी २०२४  रोजी अंतरवाली सराटी जिल्हा जालना इथून सुरू झाली आहे. 

      या पदयात्रेत त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव सहभागी आहेत. पदयात्रेतील पाचव्या दिवसाचा मुक्काम आणि जाहीर सभा वाशी (नवी मुंबई) येथे होणार आहे. या सभेस कोटींच्या संख्येने उपस्थित राहून २६ जानेवारी रोजी राजधानी मुंबईत पाय टाकत पूर्ण शहर व्यापून टाकूया. या सभेच्या विराट जाहीर सभेला आम्ही येतोय तुम्हीही या! असे आवाहन कोवाड, ता. चंदगड येथील मराठा आरक्षण उपोषण कर्ते पांडुरंग जाधव यांनी चंदगड तालुक्यासह  आजरा, गडहिंग्लज मधील तमाम मराठा बांधवांना केले आहे.

    आरक्षण हा आपला हक्क आहे. अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड असेल तर मराठ्यांना ही शेवटची संधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जसे गनिमी काव्याने प्राप्त परिस्थितीचा उपयोग करून लढले. स्वामीनिष्ठ मावळ्यांनी कांदाभाकर खाऊन स्वतः चा घोडा हत्यारे घेऊन निरपेक्ष भावनेतून त्यांना साथ दिली. म्हणूनच राजे रयतेचे राज्य स्थापन करू शकले. तद्वत आपल्यालाही मावळ्यांसारखी भूमिका पार पाडावी लागणार आहे.

      मी पांडूरंग जाधव उपोषण कर्ता "सकल मराठा चंदगड" मुंबईला जात आहे, आपणही चंदगडी मराठ्यांचा आवाज मुंबईत घुमवूया. यासाठी हजारोंच्या संख्येने स्वखर्चाने,  कोणाच्याही गाड्यांची वाट न पाहता सामिल व्हा. मनोज जरांगे पाटलांच्या निरपेक्ष नेतृत्वाखाली मराठ्यांची एकजूट दाखवून आपल्या लेकरा-नातवांचे भविष्य घडवण्यासाठी एकदाच मुंबईला चला. पदयात्रा मार्गावर मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सरकारला हे आरक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नाही. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. असे आवाहन करण्यात आले असून याला चंदगड तालुक्यातील उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

No comments:

Post a Comment