कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ऊळीचे टेक परिसरात नरसू तेऊरवाडकर यांच्या उसाच्या फडात हत्तीने केलेली नासधूस
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
दोन दिवसांपूर्वी (दि.२५/०२/२०२४) तब्बल दोन फूट लांब सुळे असलेला महाकाय टस्कर हत्ती चिंचणे जंगल परिसरातून कालकुंद्री, कुदनूर नंतर किटवाड धरण परिसरात दिसल्यामुळे संपूर्ण कर्यात भागात एकच खळबळ उडाली होती. हा हत्ती त्याच संध्याकाळी परतीच्या मार्गावर कुदनूर येथे भरवस्तीत नागरिकांना दिसला. शेकडो लोकांनी तो पाहिला. तो पुन्हा जंगलात गेला म्हणून सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला... म्हणता म्हणता तो पुन्हा माघारी फिरला आहे. कर्नाटकातील उचगाव, बेकिनकेरे शिवारात फिरून झाल्यानंतर काल रात्री (दि. २७) टस्कर ने देवरवाडी, महिपाळगड परिसरात आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट झाले असून येथे उपसरपंच अशोक कदम व तंटामुक्त कमिटी अध्यक्ष बाळासाहेब आप्पाजी भोगण यांच्या शेतातील पिकांची नासधूस केली. या ठिकाणी वनरक्षक देवीश्वर रावळेवाड व सहकाऱ्यांनी आज सकाळी (दि. २८) जाऊन पाहणी केली.
दि. २६ रोजी सायंकाळी दुंडगे नजिक शिवारात फिरणारा टस्कर हत्ती रात्री ताम्रपर्णी नदी पार करून कोवाड, किणी, हुंदळेवाडी, कागणी शिवारातून पुढे कर्नाटक हद्दीत गेल्याचे त्याच्या पायांच्या ठशावरून स्पष्ट झाले होते. तो चंदगड तालुक्यातील होसूर पासून जवळ असलेल्या सीमा भागातील उचगाव, बेकिनकेरे परिसरात असून त्याला तिकडून पुन्हा होसूर, कौलगे परिसरातील जंगलात हाकलण्याचा प्रयत्न कर्नाटक वन विभाग व ग्रामस्थांकडून सुरू होता. परिणामी चंदगड तालुक्यात हत्तीच्या पुनरागमनाची शक्यता गृहीत धरून वन विभागातील सर्व अधिकारी कोवाड परिसरात तळ ठोकून आहेत. मात्र हत्तीने उचगाव परिसरातून देवरवाडी, महिपाळगड जंगल परिसरात आसरा घेतला आहे. हा हत्ती पुढे सुंडी, करेकुंडी, कौलगे भागात केव्हाही दाखल होऊ शकतो त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन वन विभागाने केले आहे. कालपासून या अधिकाऱ्यांनी हत्तीने नुकसान केलेल्या कुदनूर, कालकुंद्री येथील ऊस व अन्य पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई साठी प्रस्ताव तयार केले आहेत. वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जॉन्सन डिसोजा, वनरक्षक देवीश्वर रावळेवाड व हत्ती हाकारा पथक तैनात आहे. यावेळी हत्तीने केलेल्या नुकसानी बरोबरच पूर्व भागातील राजगोळी खुर्द परिसरात गव्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे केल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
सध्या सर्वत्र ऊस तोडणी हंगाम जोरात सुरू आहे तथापि टस्करच्या दहशतीमुळे ऊसतोड टोळ्यांतील कामगार तसेच बीड व इतर जिल्ह्यातून सहपरिवार येऊन शिवारात मुक्कामी असलेल्या महिला व मुलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment