उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून तुडये येथील सोनाराचा खून, संशयिताला तात्काळ अटक, चंदगड पोलिसांची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2024

उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून तुडये येथील सोनाराचा खून, संशयिताला तात्काळ अटक, चंदगड पोलिसांची कारवाई

बाळकृष्ण अनंत सोनार 
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      उसने दिलेले १ लाख ३० हजार रूपये परत मागत असल्याच्या रागापोटी बाळकृष्ण अनंत सोनार (वय वर्ष ६८, मुळ गाव कालकुंद्री, सध्या रा. तुडये, ता. चंदगड) याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. याप्रकरणी संशयित आरोपी रमेश बाबू पाटील (वय वर्ष ४५ रा. तुडये ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला चंदगड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

     यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहिती अशी :- बाळकृष्ण सोनार  हे सोने चांदीचे खरेदी, विक्रीचे व्यापारी आहेत. गावागावात फिरून ते सोने-चांदीची विक्री करतात. रमेश पाटील या संशयिताने बाळकृष्ण सोनार यांच्याकडून काही दिवसांपूर्वी १ लाख ३० हजार रुपये उसने घेतले होते. अनेक वेळा पैशासाठी तगादा लावूनही रमेश याने उसने घेतलेले पैसे दिले नाहीत. दरम्यान मंगळवारी (ता. २७) दुपारी १ वाजता मध्यस्थामार्फत आपला प्रश्न सोडवूया असे खोटे बोलून धामणे - कर्नाटक हद्दीतून गुळंब गावच्या हद्दीत वाघजाई वेशीजवळ स्वप्नवेल पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडीत मोटरसायकल वरून रमेश याने बाळकृष्णला नेले. त्यानंतर घनदाट जंगलात त्यांच्यावर धारधार शस्त्राने  डोकीत, मानेवर, छातीवर, हाताच्या मनगटावर, दंडावर, हाताच्या पंजावर सपासप  प्राणघातक हल्ला केला. यामध्ये बाळकृष्ण गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडले. घाबरलेल्या रमेशने घराकडे पलायन केले. जखमी अवस्थेत  कोसळलेल्या बाळकृष्ण यांनी आपल्या मोबाईलवरून चंदगड पोलिसांना ही माहिती दिली. आपण कुठे आहोत याची माहिती दिल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. १०८ या ॲबुलन्स ने बाळकृष्ण याला उपचाराकरिता उपजिल्हा रूग्णांलयात घेऊन जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

    पोलिसांचे एक पथक संशयित रमेश याला पकडण्यासाठी तुडये येथे दाखल झाले. रक्ताने माखलेले कपडे बाथरूममध्ये धुत असताना रमेश याला पोलिसांनी अटक केली. बाळकृष्ण यांच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे. खून झाल्यानंतर रमेश याने तुडये येथे आपल्या राहत्या घरी पलायन केले. रक्ताने माखलेले कपडे बाथरूम मध्ये धूऊन अंघोळ करीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आणखीन थोडा जरी उशीर झाला असता तर रमेश फरारी झाला असता असे पो. नि. नितीन सावंत यांनी सांगितले.

       याबाबतची फिर्याद सुधाकर वसंत सोनार यांनी चंदगड पोलिसात दिली  आहे. घटनेची नोेंद चंदगड पोलिसात झाली असून अधिक तपास सहाय्यक पो. नि. अली मुल्ला करत आहेत.

No comments:

Post a Comment