कालकुंद्री येथील सुखदेव उप्पार यांच्या दुचाकीचे हत्तीने केलेले नुकसान. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
२५ फेब्रुवारी पासून चंदगड तालुक्याच्या पूर्व भागासह कर्नाटक सीमा भागात भ्रमंती करणारा टस्कर हत्ती आज पहाटे ४ वाजता थेट कालकुंद्री गावात शिरला. २५ फेब्रुवारी रोजी हाच हत्ती प्रथम कालकुंद्री येथेच ग्रामस्थांना दिसला होता. त्या नंतर १५ दिवसांनी आज सकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, खंडोबा गल्ली पाण्याच्या टाकी जवळून जाताना हत्तीने सुखदेव धानाप्पा उप्पार यांच्या नवीन मोटरसायकलच्या सीट मध्ये सुळा खुपसून गाडी ६-७ फुटावर फेकून दिली.
पुढे जाताना जवळच लावलेल्या राजाराम तुकाराम पाटील यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीकडे आपला मोर्चा वळवला. सोंडेने उलटून टाकणार असे वाटत होते पण पुन्हा ट्रॅक्टरला जीवदान देत हत्ती सरस्वती विद्यालय, काशिर्लिंग मंदिर मार्गे साडेचार वाजता ताम्रपर्णी नदी कडे गेला. यावेळी ग्रामस्थांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. तथापि सकाळी नदीकडे गेलेला हत्ती नदीतून बाहेर पडलेला कुणालाच दिसला नाही. बहुदा तो ताम्रपर्णी नदीपात्रातूनच दुंडगे च्या दिशेने गेला. स्वामीकार रणजीत देसाई यांच्या वारी शेत ते कल्लाप्पाण्णा भोगण यांच्या खडीमशीन जवळून गेल्याचा माग वन कर्मचाऱ्यांना लागला. हा हत्ती पुढे तेऊरवाडी जंगलात गेला असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.
आज सकाळपासूनच हत्ती हाकारा पथक तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कालकुंद्री हद्दीतील तांबाळ परिसरात दाखल झाले होते. पण या शिवारातील एक किलोमीटर परिसरातील सर्व ऊस तुटल्यामुळे हत्तीला लपण्यासाठी कुठेच जागा नाही. त्यामुळे तो नदी पात्रातूनच पुढे गेला असावा. शेवटी दुपारी तीन नंतर वन कर्मचारी तेऊरवाडी गावाजवळ मोहीम थांबवून घरी परतले. वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जॉन्सन डिसोजा, वनरक्षक देवीश्वर रावळेवाड व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment