कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत अपुरे कर्मचारी असल्यामुळे ग्राहकांची कुचुंबना होत आहे. या शाखेत एसबीआय व्यवस्थापनाने तात्काळ कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेेच्या वतीने नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन तालुकाप्रमुख लक्ष्मण मनमाडकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकतेच शाखा व्यवस्थापक अनिकेत कातवरे यांना दिले.
विस्ताराने मोठ्या असलेल्या संपूर्ण चंदगड तालुक्यात स्टेट बँक ऑफ इंडियाची कोवाड येथे एकमेव शाखा आहे. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच सीमा भागातून हजारो ग्राहक आर्थिक व्यवहार कामी येथे येत असतात. तथापि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पाच मिनिटांच्या किरकोळ कामासाठीही ग्राहकांना दीड दोन तास रांगेत उभे राहावे लागते. याचा वृद्ध नागरिक, महिला ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा तर दिवसभर ताटकळत थांबावे लागते. यात ग्राहकांचा अमूल्य वेळ वाया जात असून आर्थिक फटका बसत आहे.
याची दखल घेऊन देशातील सर्वात मोठ्या असलेल्या या बँकेच्या शाखेत तात्काळ पुरेसा कर्मचारी वर्ग भरून ग्राहकांना दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर, उपतालुकाप्रमुख विनोद पाटील, उपतालुका प्रमुख रवींद्र पाटील, विभाग प्रमुख मारुती पाटील, शाखाप्रमुख परशराम मुरकुटे, मारुती कांबळे, अशोक भिंगुडे, अशोक कांबळे, अनिरुद्ध कुट्रे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment