कल्याणपूर येथील गावतलाव कोरडा पडल्यामुळे पाणीबाणी...! प्रशासनापुढे आव्हान - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2024

कल्याणपूर येथील गावतलाव कोरडा पडल्यामुळे पाणीबाणी...! प्रशासनापुढे आव्हान

कल्याणपूर येथील कधी नव्हे तो कोरडा पडलेला गाव तलाव

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     चंदगड तालुक्यातील कल्याणपूर गावाला पाणीपुरवठा करणारा गावतलाव प्रथमच कोरडा ठणठणीत पडल्याने पाणी पाणी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना यंदा प्रथमच पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. 
       चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेले हे गाव दुर्गाडी टेकडीच्या पायथ्याला सन ११२६ च्या सुमारास वसल्याचा इतिहास आहे. सध्या गावची लोकसंख्या ४०० च्या आसपास आहे. येथील गावतलाव गेली अनेक वर्ष ग्रामस्थ व गावातील पशुधनाची तहान भागवत आला आहे. ऐन उन्हाळ्यातही तलाव कधीच आटला नव्हता. पण यंदा तो कोरडा ठणठणीत झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी याच तलावात जॅकवेल बांधण्यात आली आहे. त्यावर ग्रामस्थांची तहान भागत असली तरी इतर वापर व पशुधनासाठी पाणी पुरत नाही. जॅकवेलमध्ये एकच झरा असून तो केव्हाही बंद होईल अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तर ग्रुप ग्रामपंचायत कागणी मधून दोन्ही गावांसाठी संयुक्त नपापु योजनेतील काम अजून अपूर्ण असल्याने ते पाणी पावसाळ्यापूर्वी येईल याची शाश्वती ग्रामस्थांना नाही. त्यामुळे इतिहासात प्रथमच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येथील आदिवासी बांधवांवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी, पाणीपुरवठा विभाग व प्रशासनाने यावर तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तलाव कोरडा पडल्यामुळे कल्याणपूरी चवदार वांगी इतिहासजमा झाली आहेत. गेली अनेक दशके कल्याणपूरच्या चवदार वांग्यांनी खवय्यांना भुरळ घातली होती. त्यामुळेच कर्यात भागातील सर्वसामान्य ग्राहक बाजारात वांगी खरेदी करायला गेला तरी आधी चौकशी करायचा की वांगी कल्याणपूरची आहेत का? कल्याणपूरची असतील तरच ग्राहक वांगी खरेदी करायचे पण गेल्या पंधरा-वीस वर्षात तलावातील पाणी अपुरे पडू लागल्यामुळे हा चवदार ठेवा इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. कल्याणपूरच्या जमिनीत याच तलावातील पाण्यावर निघणारी वांगी पंचक्रोशीत आगळ्या वेगळ्या चवीसाठी प्रसिद्ध होती. ही चवदार वांगी खवय्यांसाठी पर्वणी असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असायची. येथील रहिवासी गाव तलावातील पाणी घागरीने नेऊन आपल्या शिवारात वांग्याचे पिक घेऊन ती वांगी गावोगावी नेऊन विकायचे. तथापि तलावात जॅकवेल बांधल्यापासून तलावातील पाणी कमी झाले. परिणामी येथील वांगी इतिहास जमा झाली. व ती विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासींचा उत्पन्नाचा एक मुख्य मार्ग बंद झाला आहे. 
   दुसरीकडे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये कल्याणपुर साठी येथील महादेव कोळी आदिवासी जमातीचा जमातीचे वास्तव्य लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने येथे त्यांच्यासाठी एक जागा राखीव ठेवली आहे तथापि शासनाकडून येथील आदिवासींना जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे गेली अनेक वर्षे ग्रामपंचायत मध्ये जागा राखीव असूनही ती रिक्तच रहात आहे. यामुळे शासन दरबारी येथील आदिवासींचे प्रश्न मांडणारा एकही हक्काचा प्रतिनिधी उपलब्ध नाही.

No comments:

Post a Comment