ॐ नमो ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाच्या पुंढरपूर वारीत सहभागी झालेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत , सुलक्षणा सावंत व वारकरी
तेऊरवाडी / एस. के. पाटील
शेजारी असणाऱ्या गोवा राज्यातील आमोणा-साखळी येथून पायी वारी पंढरपूरला रवाना झाली. या वारीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी प्रत्यक्ष सहपत्नीक सहभाग घेऊन विठूरायाच्या भक्तीत तल्लीन झाले. गळ्यामध्ये विना व हातात चिपळ्या घेऊन काही अंतर पायी प्रवासही मुख्यमंत्री सावंत यानी केला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, आपली संस्कृती लोप पावत चालल्याचे बोलले जाते. परंतु आज पंढरपूर वारीत वारकऱ्यांचा सहभाग पाहता आपली संस्कृती वृद्धिंगत होत आहे. आज ज्येष्ठ वारकऱ्यांसह युवा वारकरीही मोठ्या संख्येने वारीत सहभागी होत आहेत. या वाऱ्यांमधून गोव्यात जास्तीत जास्त वारकरी तयार व्हावेत, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत पंढरपूर वारीला शुभेच्छा दिल्या.
आमोणा - साखळी येथील ओम नमो ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाच्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पायी वारीने प्रस्थान केले. आमोणा येथून सुमारे ७० वारकऱ्यांना घेऊन वारीला सकाळी प्रारंभ झाला. दुपारी १२ च्या सुमारास साखळीतील दत्तवाडी येथील दत्त मंदिरासमोर वारी पोहोचताच मुख्यमंत्री डॉ. सावंत पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह तेथे दाखल झाले. यावेळी वारकरी मंडळाचे प्रमुख काशिनाथ माथो यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी वारीतील विठ्ठल रखुमाई मूर्तीची पूजा केली. वारकरी महिलेकडून सुलक्षणा सावंत यांची ओटी भरण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हातात चिपळ्या व गळ्यात वीणा घेऊन तसेच सुलक्षणा सावंत यांनी डोक्यावर तुळस घेऊन वारीला प्रारंभ केला. विठुरायाच्या नामाचा गजर करीत मुख्यमंत्री व इतरांनी वारीत चालत काही अंतर कापले.
" युवकांनी व्यसनांना न लागता देवाचे नामस्मरण करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा, आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा या उद्देशाने ही वारी दरवर्षी आयोजित केली जाते. दरवर्षी अशा वारीतून अनेक वारकरी तयार व्हावेत व ही वारकरी परंपरा टिकून रहावी, हीच अपेक्षा- काशिनाथ माथो (वारकरी मंडळाचे अध्यक्ष)
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ सुर्लकर, प्रसाद आजगावकर, सरपंच कृष्णा गवस, वासूदेव घाडी, आनंद घाडी' सर्वेश फुलारी आदि मान्यवर व वारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment