चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीनंतरची मतमोजणी गडहिंग्लज मध्ये केली जाते. त्याऐवजी ती चंदगड मध्येच व्हावी, तसे लेखी आदेश प्रशासन व निवडणूक आयोगाने १४ ऑगस्ट पूर्वी काढावेत अन्यथा तहसील कार्यालय चंदगड समोर १५ ऑगस्ट २०२४ पासून उपोषण करण्याचा इशारा बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर नगरसेवक नगरपंचायत चंदगड यांनी तहसीलदार चंदगड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी '२७१ चंदगड' हा मतदारसंघ गेल्या १० वर्षांत निर्माण झाला आहे. फेररचनेपूर्वी हा मतदारसंघ महाराष्ट्रातील शेवटचा म्हणजेच '२८८ चंदगड- आजरा' विधानसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात होता. सध्या विधानसभा निवडणुकी वेळी उमेदवारी अर्ज भरून घेण्याचे काम चंदगड मध्ये होत असले तरी निवडणुकीनंतरची मतमोजणी चंदगड येथे सर्व सुविधा असूनही गडहिंग्लज येथे केली जाते. हे पूर्णतः चुकीचे आहे. चंदगडचे ते गडहिंग्लज अंतर ६० किलोमीटर असल्यामुळे मतदार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व इतर यंत्रणा यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी मतमोजणी प्रक्रिया चंदगडला करावी. मतदार संघाला नाव चंदगडचे मग गडहिंग्लजला मतमोजणी का? असा प्रश्न करत या मागणीचे निवेदन ४ जुलै रोजी तहसीलदार चंदगड यांना देऊन त्याच्या प्रति प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्याकडे पाठवल्या होत्या. गेल्या १५ दिवसात या बाबत कोणत्याही हालचाली न झाल्याने आनंद हळदणकर यांनी आज दि १९ जुलै २०२४ रोजी तहसीलदार चंदगड यांना पुन्हा निवेदन दिले.
चंदगड येथे मतमोजणी करण्याचा लेखी आदेश १४ ऑगस्ट पूर्वी न झाल्यास १५ ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. निवासी नायब तहसीलदार हेमंत काामत यांचेकडे निवेदन देताना हळदणकर यांच्यासह अरुण गवळी, बाबू नेसरकर, देशपांडे, बाळू वाडकर, युवराज मनवाडकर, सिताराम नाईक, जानबा कांबळे, प्रवीण जाधव, शशी मंडलिक, अजय गोवेकर, विकी येरुडकर, बॉबी बल्लाळ, अशोक पेडणेकर, विलास चौकूळकर, जितेंद्र मुळीक, रवी सुतार गोमटेश आदींची उपस्थिती होती. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग, पोलीस निरीक्षक चंदगड आदींना पाठण्यात आल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment