कोवाड येथील जुन्या बंधाऱ्यावर दि १९/०७/२०२४ रोजी आलेले पाणी. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोवाड येथील ताम्रपर्णी नदीवरील जुना बंधारा यंदा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या पाण्यापेक्षा आत्ताची पाणी पातळी अधिक असल्याने प्रशासनाकडून नदी काठावरील व्यापारी व नागरिकांना स्थलांतरच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात ७ व ८ जुलै रोजी कोवाड बंधारा पाण्याखाली गेला होता. तथापि पावसाचा जोर कमी झाल्याने ताम्रपर्णी नदीची पाणी पातळी झपाट्याने खाली आली व नदी काठावरील व्यापारी व नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र गेल्या दोन दिवसात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने ताम्रपर्णी नदी पात्राबाहेर पडली असून तालुक्यातील अनेक बंधारे पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.
कोवाड येथील बंधाराही आज दिनांक १९ जुलै २०२४ रोजी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला. पावसाचा जोर असाच राहिल्यास महापुराची स्थिती उद्भवू शकते. येथील ९०% बाजारपेठ व अनेक घरे पूररेषेत येत असल्याने त्यांना प्रशासनाने व्यापारी व नागरिकांना सुरक्षित राहण्याबरोबरच स्थलांतरित होण्याबाबत नोटीसा बजावल्याचे समजते.
मागील आठवड्यात आलेल्या पुरस्थीती वेळी चंदगड तालुक्यातील फाटकवाडी व झांबरे उमगाव हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. यावेळी तिसरा मध्यम जंगमहट्टी धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्रातील पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. दरम्यान चंदगड तालुक्यात कृष्णा खोरे योजनेतून बांधण्यात आलेले २३ लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अवस्थेत असल्याने महापुराचा धोका आणखी वाढण्याची संभव असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment