कोवाड येथील जुन्या बंधाऱ्यावर दि २०/०७/२०२४ रोजीची पाणी पातळी. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड येथे ताम्रपर्णी नदीवरील बंधाऱ्यावरून कालपासून दोन फूट पाणी वाहत होते. त्यात आज आणखी वाढ झाल्याने पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. मागील आठवड्यापेक्षा आत्ताची पाणी पातळी अधिक असल्याने व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाकडून नदी काठावरील व्यापारी व नागरिकांना साहित्यासह सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज दुपारपासून पुराचे पाणी दुंडगे रोड वरील बाजारपेठेत घुसल्याने व्यापाऱ्यांनी आपले साहित्य हलवण्यास सुरुवात केली असून कोवाड ते दुंडगे, कामेवाडी कडे जाणारी वाहतूक त्यामुळे बंद झाली आहे.
नदी घाट नजीकच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून पुराचे पाणी दुंडगे रोडवरील बाजारपेठेत घुसले आहे. त्यामुळे दुंडगेकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. |
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने ताम्रपर्णी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील १४ पेक्षा अधिक बंधारे कालपासूनच पाण्याखाली गेले होते. संततधार पावसामुळे परिस्थिती आज आणखी गंभीर झाली आहे. मागील आठवड्यात तालुक्यात काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तथापि यावेळची परिस्थिती वेगळी आहे. कारण गेल्या आठवड्यात चंदगड तालुक्यातील केवळ फाटकवाडी व झांबरे उमगाव ही दोन धरणे भरली होती. पण जंगमहट्टी धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. ते १८ जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे ताम्रपर्णी नदीपत्रात अतिरिक्त पाण्याची भर पडली आहे. तालुक्यात कृष्णा खोरे योजनेंतर्गत बांधलेले २३ लघु धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अवस्थेत असल्याने महापुराचा धोका आणखी वाढण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान हवामान विभागानेही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन तहसील व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment