तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडताना बाळासाहेब हळदणकर
चंदगड : सी एल वृत्तसेवा
'चंदगड' विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतरची मतमोजणी गडहिंग्लज मध्ये केली जाते. त्याऐवजी ती चंदगड मध्येच झाली पाहिजे. या मागणीसाठी चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर यांनी तहसीलदार कार्यालय चंदगड समोर सुरू केलेले आमरण उपोषण आज तब्बल १० व्या दिवशी मागे घेतले. तहसीलदार राजेश चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीनंतरची मतमोजणी चंदगड मध्ये घेण्यासाठी योग्य ठिकाण पाहून तसा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला पाठवला जाईल. त्या संदर्भात सर्वपक्षीय नेते व प्रांताधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन बैठकीत पुढील निर्णय घेऊ या असे आश्वासन दिल्यानंतर हळदणकर यांनी तहसीलदार यांच्या हस्ते सरबत घेऊन दहाव्या दिवशी उपोषण सोडले. येत्या आठवडाभरात ही बैठक होणार आहे.
यावेळी नंदाताई बाभुळकर, गोपाळराव पाटील, प्रभाकर खांडेकर, संभाजीराव शिरोलीकर, विलास पाटील, विष्णू गावडे, गोविंद पाटील व चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकी वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासह इतर सर्व प्रक्रिया चंदगड मध्ये होतात. तथापि सर्व सुविधा असताना मतमोजणीच गडहिंग्लजला का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी ही मतमोजणी चंदगडला व्हावी या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. याबाबत दि ४ व १९ जुलै रोजी निवेदन तहसीलदार, प्रांताधिकारी व निवडणूक आयोग यांना निवेदन दिले होते. १४ ऑगस्ट पूर्वी मतमोजणी संदर्भातील आदेश न काढल्यास तहसील कार्यालय चंदगड समोर १५ ऑगस्ट २०२४ पासून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या निवेदनाची योग्य ती दखल न घेतल्याने त्यांनी १५ ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले होते. गेल्या १० दिवसात विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व सुमारे दिड हजार नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन लेखी पाठिंबा व्यक्त केला होता.
हळदणकर यांच्यासोबत सीताराम, नाईक, प्रवीण जाधव, नागेश प्रधान, अशोक मांडवकर, गुरुनाथ मंडलिक, बाबू नाईक, महादेव नामदेव, नामदेव नाईक यांनीही उपोषण करून साथ दिली होती.
No comments:
Post a Comment