चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोलकत्ता येथील आरजी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी वर झालेल्या भीषण अत्याचार प्रश्नी निषेध म्हणून चंदगड तालुक्यातील डॉक्टर असोसिएशन च्या वतीने आज दि १७/०८/२०२४ रोजी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. याबाबत निषेध करणारे लेखी निवेदन चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना अध्यक्ष निवृत्ती गुरव, उपाध्यक्ष सुहास धबाले, सचिव ज्योती फगरे व खजिनदार सुभाष पाटील आदींच्या स्वाक्षऱ्यांसह देऊन बंद पुकारण्यात आला.
हा गुन्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या समस्यांवर लक्ष देण्याची तातडीने गरज अधोरेखित करणारा आहे. या घृणास्पद कृत्याने केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या समस्यांवर लक्ष देण्याची तातडीची गरज असून देशातील महिलांमध्ये अशा घटनांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा घटना महिलांच्या केवळ वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन नसून मानवी जीवनाचा सन्मान राखण्यासाठी झटणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय समूहावरही हल्ला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करून संबंधित गैर कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी आपली वैद्यकीय सेवा थांबवली होती.
No comments:
Post a Comment