महादेव कोळी समाज जात प्रमाणपत्रापासून वंचित, शिवाजीराव पाटील यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2024

महादेव कोळी समाज जात प्रमाणपत्रापासून वंचित, शिवाजीराव पाटील यांना निवेदन

 

कल्याणपूर येथे शिवाजीराव पाटील यांना येथील आदिवासी महादेव कोळी समाजाकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याविषयी निवेदन देण्यात आले याप्रसंगी समाज बांधव.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड तालुक्यातील किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाज जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे संकटात सापडला आहे. शासन दरबारी अनेक अर्ज विनंत्या तसेच कोर्टकचेऱ्या करूनही यांच्या पदरात अपयश आले आहे. सर्व खटाटोप करून निराश झालेल्या तालुक्यातील आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांनी कल्याणपूर येथे भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांना निवेदन देऊन आपली गाऱ्हाणी मांडली.

    वंचित व अन्यायग्रस्त घटकांसाठी आपल्या धडाडीच्या कामामुळे धावून जाण्यासाठी चंदगड,  मुंबई, ठाणे परिसरात परिचित असलेले शिवाजीराव पाटील यांनी असे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळेच एक आशेचा किरण म्हणून तालुक्यातील महादेव कोळी बांधवांनी त्यांच्याकडे या प्रश्नी काहीतरी मार्ग काढावा अशी विनवणी केली आहे.

    चंदगड तालुक्यातील कामेवाडी कल्याणपुर व चिंचणे या गावांमध्ये आदिवासी महादेव कोळी यांचे वास्तव्य आहे किंबहुना कामेवाडी व कल्याणपूर ही दोन्ही गावांतील लोकसंख्या शंभर टक्के आदिवासी महादेव कोळी यांची आहे. यामुळेच दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये या जातीसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. तथापि जात प्रमाणपत्र नसल्यामुळे दोन्हीकडील सदस्य पदे रिक्त आहेत. कागणी कल्याणपुर ग्रुप ग्रामपंचायत साठी तर सरपंच पदच महादेव कोळी आदिवासी समाजासाठी राखीव आहे. पण या जातीचा सदस्यच नसल्यामुळे अनेक वर्षापासून हे पद रिक्त ठेवण्याची नामुष्की आली आहे.

   गेली ३०-३५ वर्षे शासन व लोकप्रतिनिधी नेहमी या समाजाला आश्वासने देऊन वेळ मारून नेतात. पण प्रत्यक्षात पदरी काही पडलेले नाही. या समाजातील बरेच जण शासकीय नोकरी करून निवृत्त झाले आहेत. तथापि त्यांची पेन्शन प्रकरणे रखडली आहेत. प्रमोशन नको पण आहे ते तरी द्या. अशी आर्त हाक कोर्टाकडे अनेक वर्षापासून सुरू आहे. तथापि तिथूनही आशेचा किरण दिसलेला नाही.

      धडाडीने काम करण्यासाठी परिचित असलेले व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवाजीराव पाटील यांच्याकडून या समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत. म्हणूनच पाटील यांनी कल्याणपुर येथे भेट दिल्यानंतर त्यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे पुरुषोत्तम सुळेभावकर, भावकू गुरव, भरमू पाटील आदी पदाधिकारी, उपसरपंच सुहास बामणे, बी एल पाटील, रवींद्र देसाई, अमृत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment