चंदगड / प्रतिनिधी
वाचनालय हे फक्त पुस्तक मिळण्याचे ठिकाण असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाचे प्रमुख केंद्र आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अतिशय निष्ठेने, सातत्याने वाचन करून आपले करिअर घडवावे असे आवाहन अर्थशास्त्रविभाग प्रमुख, डॉ. एस. एस. सावंत यांनी व्यक्त केले.
ते तेथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित ग्रंथालयआणि माहिती केंद्र व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या' विद्यार्थी जीवनात वाचनाचे महत्त्व या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
डॉ. सावंत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, 2023 च्या अहवालानुसार भारतात जवळपास 25% विद्यार्थी पुस्तक नियमित वाचतात. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक वाचन कमी होत आहे, परंतु ई-बुक्स, ऑनलाइन लेखन आणि डिजिटल सामग्री यामुळे काही प्रमाणात वाचण्याची आवड टिकून आहे. स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी व विविध विषयांचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी, विषयाच्या पलीकडील ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचन क्षमता वाढवावी असे आवाहन करून ते पुढे म्हणाले की, सातत्याने वाचन केल्यास शब्द भांडार सुधारते,भाषा सुधारण्यास मदत होते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीची पुस्तके निवडावीत, मास्टर फार्मूला वापरून, रोजच्या वाचनाचे शेअरिंग करावे, तरच आपण प्रगल्भ नागरिक बनू असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अध्यक्ष भाषणात बोलताना डॉ. गोरल म्हणाले की, वाचनामध्ये विद्यार्थ्यांनी आपली योग्य गुंतवणूक केल्यास अपेक्षित असा परतावाही चांगला मिळतो, समाजातील सुसंस्कृत नागरिक होण्याबरोबरच विचारही परिपक्व होतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालय, महाविद्यालय हीच ज्ञान मंदिरे समजून झोकून देऊन प्रयत्नशील राहायला हवे. असे सांगून त्यांनी यशस्वी झालेल्या अनेक कर्तुत्ववान व्यक्तींची उदाहरणे सांगून तुमच्यामुळेच तुमच्या घराण्याची,गावची व तालुक्याची एक नवीन ओळख व्हायला हवी असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग प्रमुख, प्रा रा. सु.गडकरी, यांनी करून महाविद्यालयातला वाचनालय विभाग हा अतिशय सक्षम असून, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आभार संगणक शास्त्र विभाग प्रमुख, प्रा. आर. व्ही.आजरेकर यांनी मानले
या कार्यक्रमाला प्रा. राहुल पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. श्रीनिवास पाटील, वीरधवल मुळीक, मुन्ना पिरजादे, मारुती माडखोलकर, नंदकुमार चांदेकर, विजय कांबळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment