चंदगड / प्रतिनिधी
हाताशी काही नसताना स्वराज्य निर्मिती करणाऱ्या शिवरायांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा. शिवरायांच्या कर्तृत्वाची विलक्षण व्यापकता तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहे.
चंदगडच्या भूमीवर स्वराज्य स्थापने वेळी पाऊल खुणा उमटल्या आहेत. इथल्या मातीला पराक्रमाचा गंध आहे. जगात सर्वाधिक पुतळे छत्रपती शिवरायांचे उभारण्यात आले आहेत,असे प्रतिपादन प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा नितीन बानुगडे पाटील यांनी केले. मजरे कारवे (ता. चंदगड) येथील बाबासाहेब कुपेकर फाउंडेशन व ज्ञान ग्रुपतर्फे आयोजित शिव व्याख्यान आणि वक्तृत्व स्पर्धा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.प्रारंभी प्रास्ताविक डॉ.नंदाताई बाभुळकर यानी प्रस्ताविक करून आता जनतेला व्यासपीठही मिळालय कदाचित तुतारीही मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
प्रा. बानुगडे पाटील पुढे म्हणाले, ``पहिले सर्जिकल स्ट्राइक लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनीच केले होते. अनुकंपा तत्त्वावर नोकरी ही संकल्पना सर्वप्रथम शिवरायांची होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना तयार करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर शिवरायांचे स्वराज्य होते असे सांगून प्रा. बानुगडे पाटील यांनी शिवकाळात सर्वाधिक लढाया केलेले सरसेनापती प्रतापराव गुजर आणि बहलोलखान यांच्यातील युद्धाचा प्रसंग कथन केला. अमेरिकेला पराभूत करणाऱ्या व्हिएतनाम सारख्या देशाला शिवराय प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले.जन्माला आल्यावर आणि जग जिंकायला गेल्यावर अशा दोन प्रसंगी बोलणे शिकावे लागते. पालकांनी आपल्या मुर्लाच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचे कौतुक करायला शिकावे. तरच ती मुले इतिहास घडवतील. असे अंगात छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ आणि शहाजी राजांनी यशाचे सूत्र सांगितले होते. राज्यातील पहिली सहकारी संस्था ही शिवरायांचे स्वराज्य होती.असे सांगून ते पुढे म्हणाले. त्या पहिल्या संस्थेच्या संस्थापिका राष्ट्रमाता जिजाऊ होत्या. छत्रपती शिवरायांच्या अचूक ज्ञान व सूक्ष्म निरीक्षण शक्ती या सद्गुणांची माहिती दिली. शिवकाळातील गुप्तहेर खाते हे संपूर्ण जगात आजही आदर्श मानले जाते. असे असताना त्या छ. शिवरायांची खरी ओळख आम्हाला होईल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रा. किसनराव कु-हाडे, उबाठाचे प्रभाकर खांडेकर, संपर्क प्रमुख रियाजभाई शमनजी, व्याख्याते अकलाखभाई मुजावर,माजी जि. प. सदस्य शिवाजी सावंत, बी. डी. पाटील, विष्णू गावडे, बसवंत अडकुरकर, रामराजे कुपेकर, भैरू खांडेकर, गणेश फाटक, नितिन फाटक, विजय भांदुर्गे, सागर पाटील, एम. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाल वक्त्यांची जोशपूर्ण भाषणे झाली. या वक्तृत्व स्पर्धेत विविध गावातील बाल वक्त्यांनी सहभाग घेतला. जोशपूर्ण आवाजात सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरील भाषणाला उपस्थितानी भरभरून दाद दिली. विजेत्या स्पर्धकांना प्रा. बानुगडे-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment