नांदवडे (ता. चंदगड) येथे सकाळच्या सत्रात मतदानासाठी मतदारांची झालेली गर्दी. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड मतदारसंघामध्ये १७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. ग्रामीण भागात सद्या सुगीचा हंगाम असल्यामुळे सकाळी मतदान करुन शेतीकामाला जाण्यासाठी मतदारांची लगबग पहायला मिळाली. महिला वर्गही यामध्ये पुढे होता. सकाळच्या सत्रात थोडी थंडी जाणवत असल्याने वयस्कर मतदार मात्र सकाळी दहानंतर मतदानासाठी बाहेर पडले. मतदान केंद्रावर महिला व पुरुष मतदारांच्या वेगवेगळ्या रांगा लागल्या असल्या तरी वयस्कर मतदारांना मात्र वाट पहायला न लावता त्यांना थेट मतदान केंद्रात प्रवेश करुन मतदान करुन घेतले जात होते. चंदगड मतदारसंघात सर्वत्र शांततेत ७४.८९ ट्कके मतदान झाले. आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १७ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. मतदार राजाच्या मनात काय आहे, कोण होणार चंदगड मतदारसंघाचा आमदार हे शनिवारी २३ ला निकालादिवशीच स्पष्ट होणार आहे. चंदगड मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८.५८ टक्के मतदान झाले. गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलच्या आवारामध्ये चंदगड मतदारसंघातील एव्हीएम मशीन जमा करुन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. शनिवारी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी गडहिंग्लज येथील पॅव्हेलियम हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.
तुडये (ता. चंदगड) येथे सायंकाळी साडेपाच वाजता मतदानासाठी लागलेली लांबच लांब रांग. |
चंदगड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी कडून शरद पवार राष्ट्रवादीच्या नंदिनी उर्फ नंदाताई कुपेकर-बाभुळकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश नरसिंगराव पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे मानसिंग खोराटे, संभाजी ब्रिगेडचे परशराम उर्फ प्रशांत पांडुरंग कुट्रे, बहुजन समाज पार्टीचे श्रीकांत अर्जुन कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन मारुती दुंडगेकर तर अपक्ष उमेदवारांमध्ये अप्पी ऊर्फ विनायक विरगोंडा पाटील, अशोक शंकर अर्दाळकर, अक्षय एकनाथ डवरी, जावेद गुलाब अंकली, तुलसीदास लक्ष्मण जोशी, नदाफ महमद इसाक, प्रकाश रामचंद्र रेडेकर, मोहन प्रकाश पाटील, रमेश सट्टूपा कुट्रे, शिवाजीराव सट्टूपा पाटील आणि संतोष आनंदा चौगुले यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. सर्वच उमेदवार मतदार संघातील गावा-गावातील मतदार केंद्रांना भेट देवून मतदानाच्या टक्केवारीची माहीती घेत होतो. प्रत्येक गावागावात फिरत मतदारसंघातील जास्त मतदार संख्या असलेल्या गावांच्यावर त्याचा भर होता.
१०१ वर्षांंचे किणे गावचे सोमा तातोबा कांबळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. |
नांदवडे (ता. चंदगड) येथे इंदुबाई महादेव शिंदे या वयस्कर महिलेने मतदानाचा हक्क बजावला. |
उमेदवाराच्या पक्षांच्या कार्यकर्ते जास्तीत-जास्त मतदान करण्यासाठी आपल्या मर्जीतील लोकांना प्रवृत्त करत होते. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्याचे नियोजन काल रात्रीपासून करण्यात आले होते. विविध पक्षांचे कार्यकर्ते टेबल लावून मतदार यादीतील नाव मतदारांना शोधून देण्यास मदत करत होते. गावा-गावातील वयस्कर मतदारांना दुचाकी चारचाकी वाहनांतून मतदान केंद्रावर मतदानासाठी आणले जात होते. तुडिये (ता. चंदगड) येथील मतदान केंद्रावर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा पहायला मिळाल्या.
मतदान केल्यानंतर हात उंचावून दाखविताना अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील. |
प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष १, मतदान अधिकारी १, २ व ३, होमगार्ड, शिपाई, पोलीस असे कर्मचारी काम करत होते. ८५ वर्षावरील वयस्कर व दिव्यांग मतदारांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणत्रांचे वाटप करण्यात आले.
मतदान केल्यानंतर मतदान केल्याचे दाखविताना जनसुराज्य पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराटे |
तुडिये मतदान केंद्रावर ८५.६५ टक्के मतदान झाले. ३१८२ पैकी २६७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार केंद्रावर संथगतीने मतदान प्रकीया सुरु होती. त्यामुळे सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान केंद्रावर लांबच-लांब रांगा पहायला मिळाल्या. सायंकाळी उशिरा मतदान प्रकिया पार पडली.
चंदगड मतदारसंघातील चंदगड शहरामध्ये ९ मतदान केंद्रावर ७४.८५ टक्के मतदान झाले. या नऊ मतदान केंद्रावर ८१२९ पैकी ६०८५ मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला.
आता प्रतिक्षा निकालाची...........
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक गावा-गावात कोण - कोणापेक्षा वरचढ होणार. आपल्या उमेदवाराला मत कशी जास्त पडणार. यासाठी काय-काय केले. यावरुन गाव, तालुका व मतदारसंघाच्या मतांचे अंदाज बांधले जात होते. यातून आपला उमेदवार कसा व किती मतांनी निवडून येणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मतदानानंतर ठिक-ठिकाणी लोक याबाबत चर्चा करत होतो. मतमोजणीला अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. शनिवार (ता. २३) ला गडहिंग्लज येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. कोणीही किती अंदाजे वर्तवले तरी शनिवारी निकालानंतरच आमदार कोण हे कळणार आहे.
शिवाजीराव पाटील (अपक्ष)
२३ तारखेला गुलाल आमचाच आहे. जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तरुण वर्ग माझ्या पाठीशी आहे. लाडक्या बहिणीही आमच्या सोबत आहेत. मतदारसंघात परिवर्तनाची लाट आहे. माझी सैनिक देखील स्वत:लाच उमेदवार समजून माझ्यासाठी राबत आहेत. कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. दिवसरात्र प्रचार करुन माझी भूमिका लोकांना पटवून दिली आहे. त्यामुळे विजय हा निश्चित आमचाच आहे.
विनायक उर्फ अप्पी पाटील (अपक्ष)
आजरा व गडहिंग्लमध्ये नागरीकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातून जास्तीत-जास्त मतदान होईल. चंदगड तालुक्यातून विशेषत: कोवाड भागातून आम्ही आघाडीवर राहू.
No comments:
Post a Comment