चंदगड मधून विक्रमी १७ उमेदवार रिंगणात, ८ जणांची माघार..! कोण कोण आहेत उमेदवार...? - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2024

चंदगड मधून विक्रमी १७ उमेदवार रिंगणात, ८ जणांची माघार..! कोण कोण आहेत उमेदवार...?

 


चंदगड :  सी एल वृत्तसेवा 

    आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चंदगड तहसील कार्यालयात उमेदवार व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. कोण माघार घेणार व कोण निवडणूक लढवणार? याची मतदारांना उत्सुकता लागून राहिली होती.  माघारीच्या वेळेपर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत २५ पैकी ८ उमेदवारांनी माघार घेतली तर १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.  रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांमध्ये महायुतीकडून तिकीट नाकारण्यात आलेले भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाविकास आघाडी कडून तिकीट न मिळालेले विनायक उर्फ अप्पी पाटील यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी ठेवली आहे. याशिवाय महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे राजेश पाटील तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. नंदाताई बाभुळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

      आज अर्ज माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांनी  माघार घेऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय काँग्रेसचे गोपाळराव पाटील, अपक्ष सुष्मिता राजेश पाटील, मनीषा मानसिंग खोराटे, केदारी यल्लाप्पा पाटील नारायण रामू वाईंगडे, अण्णासाहेब विनायक पाटील, प्रकाश राजाराम कागले यांनी माघार घेतली आहे.

       रिंगणात असलेल्या १७ उमेदवारांमध्ये महाविकास आघाडी कडून शरद पवार राष्ट्रवादीच्या नंदाताई बाभुळकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश नरसिंगराव पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे मानसिंग खोराटे, संभाजी ब्रिगेडचे परशराम उर्फ प्रशांत पांडुरंग कुट्रे, बहुजन समाज पार्टीचे श्रीकांत अर्जुन कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन मारुती दुंडगेकर, तर अपक्ष उमेदवारांमध्ये अप्पी ऊर्फ विनायक विरगोंडा पाटील, अशोक शंकर अर्दाळकर, अक्षय एकनाथ डवरी, जावेद गुलाब अंकली, तुलसीदास लक्ष्मण जोशी, नदाफ महमद इसाक प्रकाश रामचंद्र रेडेकर, मोहन प्रकाश पाटील, रमेश सट्टूपा कुट्रे, शिवाजीराव सट्टूपा पाटील आणि संतोष आनंदा चौगुले यांची उमेदवारी कायम राहिली आहे.

संग्राम कुपेकर यांचा राजेश पाटील यांना पाठींबा

    माघारीची मुदत संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संग्राम कुपेकर यांनी आपण युतीधर्म पाळत वरिष्ठांच्या सुचनेनुसार या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अजित पवार राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना पाठींबा देत आहे. त्यांच्या प्रचाराची संपुर्ण जबाबदारी घेत त्यांना निवडुण आणणार आहे. याबाबत कार्यकर्त्यांना सुचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 



    हलकर्णी येथील पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांना समविचार आघाडीचा पाठींबा

        महाविकास आघाडीशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी आपला अर्ज भरला होता. मात्र आजच्या माघारीच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज माघार घेतला नाही. त्यांच्यासोबत अर्ज भरलेले काँग्रसचे गोपाळराव पाटील यांनी आपला अर्ज वरिष्टांच्या सुचनेनुसार माघारी घेत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्याचे जाहिर केले होते. मात्र आज हलकर्णी फाटा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनुसार आपण अपक्ष उमेदवार अप्पी पाटील यांना पाठींबा देत असल्याचे जाहिर केले. त्याचबरोबर उबाठा शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर, बळीराजा संघटनेचे नितीन पाटील, आजऱ्याचे संपत देसाई, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी आपण अपक्ष उमेदवार अप्पी पाटील यांना पाठींबा देत असल्याचे जाहिर केले. 

        वरील सर्वांनी राजर्षी शाहू समविचार आघाडी स्थापन करुन अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांना पाठींबा देत असल्याचे सांगितले. 

No comments:

Post a Comment