राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थींनी प्रणिता गावडेवर यशस्वी हृदय रोग शस्त्रक्रीया - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2024

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थींनी प्रणिता गावडेवर यशस्वी हृदय रोग शस्त्रक्रीया

 

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर प्रणिता गावडे सह डॉ. अर्जुन अडनाईक (हृदयरोग तज्ञ), डॉ. रेणू अडनाईक (बालरोग तज्ञ) व प्रणिताचे आई वडील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत विद्या मंदिर हल्लारवाडी (ता. चंदगड) येथील शालेय आरोग्य तपासणी २१ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. स्नेहल पाटील आणि डॉ. योगेश पवार यांनी केली. तपासणी दरम्यान प्रणिता विठ्ठल गावडे हिला हृदय रोग असल्याचे निदान झाले होते. डॉ. पवार आणि डॉ. पाटील यांनी शाळेतील शिक्षकांना याची कल्पना देऊन पालकांशी संपर्क साधून पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे संदर्भित केले होते. त्या नंतर स्वस्तिक हॉस्पिटल कोल्हापूर येथे ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रणिताची हृदय शस्त्रक्रिया डॉ. अर्जुन अडनाईक यांनी यशस्वीपणे पार पाडली.

    तत्पूर्वी ग्रामीण रुग्णालय चंदगड वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमजाळ यांच्या सल्यानुसार प्राथमिक तपासणी करून तिला 2D echo साठी डॉ. अर्जुन अडनाईक (हृदयरोग तज्ज्ञ) स्वस्तिक हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठविले. 2D echo टेस्ट  झाल्यानंतर प्राणिताला ASD (Atrail Septal Defect) हृदयरोग असल्याचे डॉ. अडनाईक यांनी समजावून सांगून ऑपरेशनची गरज असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रणिताच्या कुटुंबिय ऑपरेशनसाठी तयार झाले. 

    डॉ. अमोल पाटील, डॉ. अर्जुन अडणाईक, डॉ. बी. डी. सोमजाळ, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. योगेश पवार, रुचिता बांदेकर यांच्या सल्याने प्रणिता ३ डिसेंबरला २०२४ ला स्वस्तिक हॉस्पिटल कोल्हापूर येथे ॲडमिट झाली. व यशस्वीपणे पार पाडली.

    राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत तिच्या तपासणी पासून सर्जरी होईपर्यंतचा सर्व खर्च हा या योजनेतून करण्यात आला. ऑपरेशन झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना आपल्या पाल्याची सुखरूपता पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी सर्व डॉक्टर व स्टॉफचे आभार मानले.

   अशा प्रकारची शस्त्रक्रिया स्वखर्चाने पालकांना करावी लागली असती तर किमान १० लाख रुपये यासाठी खर्च झाले असते. तथापि महाराष्ट्र शासनाने गेली अनेक वर्षे शालेय आरोग्य तपासणीच्या माध्यमातून असे अनेक विद्यार्थी रोगमुक्त केले आहेत. यातील ९५ टक्के पालकांना आपल्या मुलाला हृदयरोग किंवा अन्य कोणताही रोग असल्याचे माहिती नसते. त्यामुळे ज्यावेळी शालेय आरोग्य तपासणी होते त्या दिवशी शंभर टक्के मुलांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी शिक्षक व विशेषता संबंधित पालकांची असते.  शालेय आरोग्य तपासणीच्या दिवशी आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत हजर नसेल तर अशा पालकांनी जवळच्या शाळेत ज्या दिवशी आरोग्य तपासणी असेल तेव्हा जाणीवपूर्वक आपल्या मुलांना तिथे घेऊन जाऊन त्याची आरोग्य तपासणी करून घेण्याची गरज असते. याचे महत्त्व  वरील घटनेवरून पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.

No comments:

Post a Comment