राकसकोप धरणात ४० फूट खोल बुडालेला टेम्पो रेस्क्यू टीम व ग्रामस्थांनी ३८ तासांनी काढला बाहेर - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2024

राकसकोप धरणात ४० फूट खोल बुडालेला टेम्पो रेस्क्यू टीम व ग्रामस्थांनी ३८ तासांनी काढला बाहेर

 

राकसकोप धरणात बुडालेला  रेस्क्यू टीम व ग्रामस्थांनी बाहेर काढलेला टेम्पो

उत्तम पाटील / तुडिये : सी एल वृत्तसेवा

       राकसकोप धरणातील पाण्यात बुडालेला मालवाहू छोटा हत्ती टेम्पो बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. तब्बल ३८ तास तुडये परिसरातील ग्रामस्थ व एच.ई.आर.एफ. रेस्क्यू  फोर्सचे जवान प्रयत्न करत होते. यासाठी स्थानिक जलतरणपटूंनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

  बुधवार दि ४/१२/२०२४ रोजी दुपारी बाराच्या सुमारास शंकर  झंगरुचे हे  आपला    KA22 D 5147 या क्रमांकाचा मालवाहू टेम्पो धुण्यासाठी राकसकोप जलाशयाच्या काठावर  घेऊन गेलेले  असताना, गियर  न्यूट्रल झाल्याने  टेम्पो पाण्यात वाहून गेला  होता. घटनास्थळी असलेल्या पाण्यातील तीव्र उतारामुळे व हौदयात पाणी शिरल्याने, टेम्पो काठापासून सुमारे ३०० फूट दूर व ४० फूट  खोल पाण्यात जाऊन  बुडाला होता. काठापासून लांब व खोल अंतर यामुळे टेम्पो बाहेर काढण्यास रेस्क्यू टीमला  अडथळे येत होते. दरम्यान गोप्रो कॅमेऱ्याच्या सहाय्याने टेम्पोचे पाण्यातील स्थान निश्चित झाल्यावर, एच. ई.आर. एफ. चे प्रमुख बसवराज हिरेमठ यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू  टीम च्या सहकाऱ्यांच्या  मदतीने, स्थानिक जलतरणपटूंनी खोल पाण्यातील टेम्पो ला लोखंडी हुक अडकवण्यात यश मिळवले. स्थानिकांच्या मदतीने दोरखंडाच्या सहाय्याने टेम्पो पाण्याबाहेर काढण्यात अखेर यश आले. एच. ई. आर. एफ. रेस्क्यू फोर्सच्या  कर्मचाऱ्यांसह स्थानिक जलतरणपटू दर्शन झंगरुचे (सोनोली), उत्तम पाटील, ज्ञानेश्वर पाटील (तुडिये), नंदकुमार पाटील व नामदेव बडसकर (मळवीवाडी) यांनी शोध मोहिमेत विशेष सहभाग घेतला. याबद्दल  त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment