ॲड. संतोष मळवीकर यांच्या विरोधात चंदगड पोलीसांत गुन्हा दाखल, वाचा काय आहे कारण.... - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2024

ॲड. संतोष मळवीकर यांच्या विरोधात चंदगड पोलीसांत गुन्हा दाखल, वाचा काय आहे कारण....

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची चंदगड येथे नेमणूक झाल्यापासून आज अखेर त्यांची व पोलीस खात्याची व्हाट्सअप, फेसबुक पेज, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक मिडिया तसेच साप्ताहिक रोखठोक आवाज या साप्ताहिकामध्ये जाणीवपूर्वक बदनामी केल्याच्या कारणावरून ॲड. संतोष मळवीकर यांचेवर चंदगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विश्वास रामचंद्र पाटील- पोलीस निरीक्षक चंदगड यांनी पोलिसात दिली आहे. मळवीकर यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 359/2024 नुसार पोलीस अधिनियम (अप्रीतीची भावना चेतवणे) 1922 चे कलम 3 सह भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 358 दोन तीन प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

   याबाबत चंदगड पोलीस ठाणे येथून मिळालेली अधिक माहिती अशी, खाकीड्रेस मधील विश्वासामुळे मटका, जुगार, क्लब, तीन पत्ती अशा अवैध धंद्यानंतर आता चंदगड मध्ये बुधवार पेठ, अशा आशयाची पोस्ट टाकून ती डिलीट केली. त्यामुळे चंदगड मधील सर्व महिलांची बदनामी झाली आहे. अशी पोस्ट टाकणाऱ्या मळवीकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा त्याला अटक करा. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असे म्हणत सुरेश सातवणेकर, अक्षय सबनीस, फिरोज मुल्ला, प्रवीण फगरे, सचिन बल्लाळ, विजय कडुकर, महादेव वांद्रे, राजाराम सुके, मोहसीन नाईक, सिद्धार्थ कोरगावकर, अभिजीत कुट्रे असा चंदगड मधील सुमारे 40 ते 50 जणांच्या जमाव काल दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रात्री सुमारे नऊ ते दहा सुमारास पोलीस ठाणे चंदगड येथे दाखल झाला. डिलिट केलेल्या पोस्टची रात्री उशिरापर्यंत गोपनीय विभाग मार्फत तपासणी सुरू होती.

  वरील पोस्ट शिवाय मळवीकर यांनी गेल्या आठ-दहा महिन्यात- 'चंदगड पोलिसांकडून तालुक्याचा सत्यानाश', गडहिंग्लज डी वाय एस पी... वर्दीतील विश्वासाची बदली विश्वासाने नाही झाली तर.... लवकरच.... आम्ही जे सांगतो ते करतो, निर्णय तुमचा', 'चंदगड तालुक्यात 30 40 चोरांची टोळी.... चंदगड पोलीस निवांत झोपा काढताहेत', अशा अनेक पोस्ट व बातम्या विविध माध्यमांमधून टाकत आहेत. तर दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज यांच्या निर्भया पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग दरम्यान पाटणे फाटा येथून कारवाई करत असताना, पथकातील अधिकाऱ्यांना 'तुम्ही कसली कारवाई करता? तुम्हाला सिविल ड्रेस वर कारवाई करण्याची परवानगी कोणी दिली? तुम्हाला काय अधिकार आहे?' असे म्हणून सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने बोलून लोकांसमोर कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा जनतेमध्ये अपमान केला. पोलीस खात्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने अनेक घटना व बातम्या या काळात त्यांनी वेळोवेळी केलेल्या आहेत. त्यामुळे ॲड. संतोष मळवीकर राहणार नांदवडे, तालुका चंदगड यांच्याविरुद्ध वरील प्रमाणे  फिर्याद दाखल झाली आहे.

   वरील सर्व घटनांचा विचार करता मळवीकर यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून चंदगडचे रहिवासी व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे.

No comments:

Post a Comment