![]() |
सह्याद्रीच्या डोंगर कपारीत वसलेला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पारगड किल्ला |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्य किल्ले परगडावरील पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला आहे. ३४८ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली. तेव्हा किल्ल्यावर ४ तलाव आणि १८ विहिरींचे बांधकाम केल्याची नोंद आहे. सद्यस्थितीत यातील तीन तलाव आणि चार विहिरी अस्तित्वात आहेत. गेली सुमारे साडेतीनशे वर्षे या पाणीपुरवठा यंत्रणेत कोणताही बदल झाला नाही. अपवाद म्हणजे बाबासाहेब कुपेकर हे विधानसभा सभापती असतानाच्या काळात एक नळपाणी योजना मंजूर होऊन काम पूर्तता झाली होती. तथापि ही योजना एका वर्षातच कुचकामी ठरून बंद पडली आहे. हे शासनाचे अपयशच म्हणावे लागेल. परिणामी गडावरील मावळे शिवकाळापासून अजूनही याच तलाव आणि विहिरींवर अवलंबून आहे.
गडावर पावसाळ्यात पाणी मुबलक मिळते पण फेब्रुवारी नंतर पाण्याचा ठणठणात जाणवतो. या प्रश्नी ग्रामस्थांनी अनेक वेळा उपोषण आंदोलने केली. येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी ग्रामस्थांसह चंदगड पंचायत समिती समोर पाणी प्रश्नासाठी १ मार्च २०२३ रोजी आमरण उपोषण केले होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ८८ लाख ५६ हजार रुपये मंजुरीचे पत्र व वर्क ऑर्डर देऊन उपोषण थांबवले होते. या कामी भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे समर्थक लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आंदोलकांनी उपोषण थांबवले होते. आज हेच शिवाजीराव पाटील आमदार झाल्यामुळे ग्रामस्थांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.
गतवर्षी पासून रडत खडत नळपणी योजनेचे काम सुरू झाले. योजनेचे बऱ्यापैकी काम झाले आहे असे समजते. मात्र सध्य स्थितीत हे काम थंडावले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना या कामासाठी लोकसहभाग म्हणून ६० हजार रुपये भरावे लागणार असे सांगितल्यानंतर. एक वेळच्या जेवणासाठी महाग असलेल्या इथल्या ग्रामस्थांनी पैनपै जमवून ६० हजार रुपये इतकी रक्कम शासनाकडे भरली आहे. तरीही या विभागाचे अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. तर ठेकेदाराकडून कामाच्या कोणत्याही हालचाली होत नाहीत. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
अधिकाऱ्यांची टोलवाटली आणि ठेकेदाराची दिरंगाई यांच्या कचाट्यात पारगडचा पाणी प्रश्न रेंगाळला असून ग्रामस्थ व पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी मार्चनंतर पाण्याअभावी येथील रहिवाशांना दोन-तीन महिने अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवते. तथापि याचे सोयरसुतक व गांभीर्य प्रशासन अधिकारी व प्रतिनिधींना आहे की नाही. सध्या शिवाजीराव पाटील आमदार म्हणून निवडून आल्यामुळे पारगड ग्रामस्थ व पर्यटकांच्या पाणी प्रश्नाबाबतच्या आशा उंचावल्या आहेत. त्यांनी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत चंदगड तालुक्यात बैठकीचे आयोजन केले आहे असे समजते. या बैठकीतून तालुक्यातील रेंगाळलेल्या प्रश्नांना गती मिळेल अशी भाबडी आशा येथील नागरिक बाळगून आहेत. तथापि फेब्रुवारी अखेरपर्यंत योजना पूर्ण होऊन गडावर पाणी न आल्यास १ मार्च २०२५ पासून पंचायत समिती कार्यालय समोर पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा रघुवीर शेलार, यांच्यासह पारगड येथील विठ्ठल शिंदे, प्रकाश चिरमुरे, संभाजी जांभळे, सुनील मालुसरे, धोंडीबा बेर्डे, तुळसीदास गडकरी आदींनी दिला आहे.
No comments:
Post a Comment