पुण्यात वापरलेली कार |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील कोवाड ते निट्टूर रोडवरील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेनजीकची एटीएम मशीन फोडून त्यातील तब्बल १८ लाख ७७ हजार ३०० रुपये इतकी रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना ४ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी साडेसात ते रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद शाखा व्यवस्थापक आशिष हरिश्चंद्र रोकडे यांनी कोवाड पोलिसात दिली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अ ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे चंदगड तालुक्यासह बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत कोवाड व चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे काम करत असलेल्या एसबीआय शाखा अंतर्गत कोवाड येथील एटीएम सेंटरमध्ये बसवलेले मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅस कट्टर व इतर साधनांनी कट करून व जाळून फोडले. या एटीएम मशीन मध्ये तब्बल १८ लाख ७७ हजार ३०० रुपये इतकी रक्कम होती, असे बँक मॅनेजर रोकडे यांनी पोलिसांना सांगितले. ही सर्व रक्कम चोरून नेण्यात चोरटे यशस्वी ठरले. या घटनेमुळे बँक व ग्राहक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कोवाड पोलीस दूरक्षेत्र हे चंदगड पोलीस स्टेशन पासून ३० किलोमीटर अंतरावर असून या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक बी. ए. चौगुले चंदगड पोलीस ठाणे यांनी दाखल करून घेतली असून ए. एस. डोंबे (पोलीस उपनिरीक्षक चंदगड) व सहकारी अधिक तपास करत आहे.
गुन्ह्यात वापरलेली कार सापडली
गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार राजस्थान राज्यातील असून प्रत्यक्षात गाडीच्या मागे डुप्लिकेट नंबर प्लेट लावण्यात आली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने या गाडीचा तपास केला असता. ही कार गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जलद्याळ मार्गावर सापडली आहे. गाडीत गॅस कटर व गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य तसेच टाकून दुसऱ्या गाडीतून चोरट्यांनी पोबारा केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अज्ञात चोरट्यांच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले आहे.
No comments:
Post a Comment