चंदगड- अक्कलकोट एसटी बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, एसटी प्रेमी प्रवाशाकडून मार्ग फलक प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2025

चंदगड- अक्कलकोट एसटी बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, एसटी प्रेमी प्रवाशाकडून मार्ग फलक प्रदान

  

नव्याने सुरू करण्यात आलेल्या चंदगड आगाराच्या बसला  रंगीत मार्ग फलक प्रदान करताना एसटी प्रेमी नागरिक मधुर जाधव सोबत एसटीतील अधिकारी, वाहक चालक व कर्मचारी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड आगाराच्या वतीने गेल्या महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या चंदगड- अक्कलकोट या एसटी बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अशी माहिती आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी दिली आहे. 

       चंदगड आगाराचे नूतन आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी विविध मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर काही बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर यापूर्वी सुरू असलेल्या पण गेल्या काही वर्षात विविध कारणामुळे बंद पडलेल्या तालुका अंतर्गत ग्रामीण व विविध मार्गावरील फेऱ्या पुन्हा सुरू केल्या असून याला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. सतीश पाटील यांच्या योग्य नियोजनामुळे एकेकाळी महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या चंदगड आगाराला पुन्हा एकदा 'अच्छे दिन' येतील अशी आशा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.

    चंदगड आगारातून सुरू करण्यात आलेली चंदगड अक्कलकोट ही बस चंदगड येथून सकाळी साडेसात वाजता सुटते तर अक्कलकोट येथून सकाळी ६.४५ वाजता सुटते ही बस जाताना चंदगड, गडहिंग्लज, कोल्हापूर, मिरज, सांगोला, पंढरपूर, सोलापूर मार्गे अक्कलकोट ला जाते. परतीच्या प्रवासात याच मार्गावरून ती चंदगडला येते या बसमुळे मार्गावरील विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसह पंढरपूर व अक्कलकोट सह तुळजापूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे.

      या बससाठी चौकुळ, ता. सावंतवाडी येथील (सध्या राहणार झांबरे) एसटी प्रेमी नागरिक मधुर जाधव यांनी रंगीत मार्ग फलक देऊन आपले योगदान दिले. यावेळी आगाराचे वाहतूक निरीक्षक व्ही एस बेडगे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक ए डी मुल्ला, चालक एस बी शिंगे, वाहक एस बी पाटील, के बी वाघ आदी उपस्थित होते. मधुर जाधव यांनी यापूर्वीही कानूर- कोल्हापूर एसटी बस साठी मार्ग फलक देणगी देऊन सहकार्य केले होते. याबद्दल त्यांचे आगार व्यवस्थापक सतीश पाटील, योगेश संगर आदी अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment