इंडियन नेव्ही मुळे जगातील सर्व महासागरांमध्ये हेलिकॉप्टर मधून डायव्हिंग करण्याची संधी मिळाली....! नौदल अधिकारी ए. के. पाटील, चंदगड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2025

इंडियन नेव्ही मुळे जगातील सर्व महासागरांमध्ये हेलिकॉप्टर मधून डायव्हिंग करण्याची संधी मिळाली....! नौदल अधिकारी ए. के. पाटील, चंदगड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात

 

पत्रकार दिन प्रसंगी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना निवृत्त नौदल अधिकारी अशोक पाटील, चंदगड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       विद्यार्थी दशेत भूगोलाच्या पुस्तकात वाचलेल्या अटलांटिक, पॅसिफिक, हिंद अशा महासागरात हेलिकॉप्टर मधून डायव्हिंग करण्याची संधी मला इंडियन नेव्हीत गेल्यामुळे मिळाली. असे समुद्राच्या अंतरंगातील रोमांचकारी अनुभव कालकुंद्री गावचे सुपुत्र व सध्या बेळगाव रहिवाशी, रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष व अक्षता अंडरवॉटर सर्विसेस चे मालक भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी अशोक कल्लाप्पा पाटील यांनी कथन केले. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ (शासन मान्य) आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दैनिक पुढारी चे पत्रकार व चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील होते.

       दाटे येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत ज्येष्ठ पत्रकार उदयकुमार देशपांडे यांनी केले. पत्रकार संघाचे संस्थापक अनिल धुपदाळे यांनी प्रास्ताविक करताना पोटार्थी  पत्रकारीता आणि गोदी मिडिया मुळे लोकशाहीचा चौथ्या आधारस्तंभाची स्थिती चिंताजनक बनत आहे. चंदगड तालुका पत्रकार संघाचे पत्रकार पत्रकारीतेवर निष्ठेने गेली तीस वर्षे प्रामाणिक व जबाबदारी ने कार्यरत आहेत, असे सांगितले. यावेळी बोलताना अशोक पाटील यांनी आपल्या इंडियन नेव्ही सर्विस मधील अनेक रोमांचकारी अनुभव सांगताना भारतीय नौदलाचे जहाज महासागरात टाकलेल्या जाळ्यात एकदा गुरफटून  पडले होते. यावेळी आपण दोन-तीन सहकाऱ्यांच्या मदतीने ऑक्सिजनची नळकांडी पाठीवर घेऊन हे अडकलेले जाळे कटरच्या साह्याने सहा तास लागून कट करून जहाजाला सोडवले. त्यांनी समुद्रातील प्राणघातक हल्ला करणारे शार्क, जेली फिश यांचा धोका तसेच श्रीलंकेतील जाफना समुद्रातील शत्रूंशी झालेली चकमक, असे अनेक अनुभव सांगितले. महाराष्ट्र व कर्नाटकात पाण्याच्या खाली बांधकामे करण्याचा अनुभव कोणालाही नव्हता. अशा काळात सेवानिवृत्तीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे आपण अक्षता अंडरवॉटर सर्विसेस ही कंपनी स्थापन करून त्याद्वारे समुद्राच्या किंवा जलाशयाच्या २०० ते ५०० फूट खोल पाण्यात अनेक बांधकामे केली.  पाण्याच्या तळाशी सिमेंटची बांधकामे, वेल्डिंग करण्याचे काम आपण सुरू केले. यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अनेक तरुणांना याबद्दलचे प्रशिक्षण देऊन त्यांना तयार केल्याचे सांगितले. बेळगाव रोटरी क्लब व इतर संस्थांच्या माध्यमातून समाजातील अनाथ व गरजू रुग्ण, विद्यार्थी यांना मदतीचा हात देण्याचे त्यांचे कार्य निरंतर सुरू आहे.

       यावेळी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सेलू (जि. परभणी) येथे होणाऱ्या पत्रकार अधिवेशनास उपस्थित राहणे, पारगड येथे पत्रकार भवन बांधणे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यावतीने तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकारिता सर्टिफिकेट कोर्स घेऊन त्यांना प्रमाणपत्र देणे, तसेच पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेबद्दल माहिती दिली.

   यावेळी पत्रकार संघ व पत्रकार अनिल धुपदाळे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार चंदगड टाइम्सचे संपादक संतोष सावंत- भोसले यांना तर आदर्श उदयोन्मुख समाजसेवक पुरस्कार चंदगड येथील एकनाथ म्हाडगूत यांना जाहीर करण्यात आला.

    यावेळी बी न्यूज चे पत्रकार व आर चॅनेल चे संपादक राजेंद्र शिवनगेकर, साप्ताहिक सत्य घटना चे संपादक राहुल पाटील, डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष व चंदगड लाईव्ह न्युज चॅनेल चे संपादक संपत पाटील, टीव्ही ९ चे पत्रकार नंदकिशोर गावडे,  पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे, सदस्य व पत्रकार संदीप तारीहाळकर, चेतन शेरेगार, सागर चौगुले, संजय मष्णू पाटील, संजय के पाटील, उत्तम पाटील, प्रदीप पाटील आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पाटील यांनी केले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष सावंत- भोसले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment