![]() |
कालकुंद्री येथील तुकाराम पाटील यांचे आगीत पूर्णपणे भस्मसात झालेले राहते घर. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे बुधवार दि. ५/२/२०२५ रात्री ९ वाजता लागलेल्या आगीत तुकाराम सुबराव पाटील यांचे राहते घर व घरातील प्रापंचिक साहित्य पूर्णपणे भस्मसात झाले. या दुर्दैवी घटनेत ३ लाख रुपयांच्या नोटांसह सुमारे ८ लाख रुपये पेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून याबाबतचा पंचनामा तलाठी कार्यालय मार्फत करण्यात आला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कालकुंद्री येथील तानाजी गल्लीत तुकाराम पाटील यांचे जुने राहते कौलारू घर आहे. काल दि. ५ रोजी रात्री पाउणे नऊच्या सुमारास ही आग लागली. गावात भर वस्तीत असलेल्या या आगीमुळे एकच हाहाःकार उडाला. सर्व गावकरी मिळेल त्या साहित्यातून पाणी घेऊन आग विझवण्यासाठी धावले. तरुणांनी जीवावर उदार होत आग आटोक्यात आणल्याने नजीकची घरे आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचली. आग आटोक्यात आल्यानंतर काही वेळाने गडहिंग्लज येथून आलेल्या अग्निशामक बंब गावात दाखल झाला.
आग लागण्याच्या काही वेळ आधी तुकाराम पाटील यांचे कुटुंबीय गावातील पाहुण्यांच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे तिकडे गेले होते. घरातील सर्व सदस्य लग्न घरात जेवण्यासाठी गेले असल्याने चूल किंवा गॅस पेटवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे ही आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज सकाळी वीज वितरण कंपनी कोवाड कार्यालयाचे सहा. अभियंता संजय मगदूम यांनी घटनास्थळी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.
तुकाराम पाटील यांनी नवीन घर बांधकाम सुरू केले असल्यामुळे त्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ऊस बिल व अन्यत्र जमवाजमव करून २ लाख रुपये घरी ठेवले होते. तर त्यांचा मुंबई येथे पायन्यासोनिक कंपनीत इंजिनिअर असलेला मुलगा विनायक हा लग्नकार्यासाठी कालच दुपारी गावी आला होता. त्याने वर्क फ्रॉम होम साठी कंपनीचे लॅपटॉप तसेच लग्नकार्य व घरी देण्यासाठी आणलेले १ लाख रुपये असे ३ लाख रोख रुपये आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. लॅपटॉप सोबत त्यातील कंपनीचा डाटाही जळून नष्ट झाला. एवढेच काय कुटुंबातील सदस्यांचे अंगावरील कपडे वगळता घरातील सर्व कपडेलत्ते, अंथरूण पांघरूण, दागदागिने व धान्य अक्षरशः जळून खाक झाले. बांधकाम सुरू असलेले घर अद्याप अपूर्ण असल्याने हे कुटुंब सध्या उघड्यावर पडले आहे. दरम्यान रात्री आग लागल्याचे समजताच चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशाने कोवाड दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा आज दि ६ रोजी सकाळी मंडळ अधिकारी शरद मगदूम, तलाठी शुभम मुंडे, पोलीस पाटील संगीता कोळी, उपसरपंच संभाजी पाटील, ग्रामपं. सदस्य प्रशांत मुतकेकर, कोतवाल शशिकांत सुतार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
"कोवाड परिसरात अग्निशामक बंब तैनात करण्याची गरज"
कोवाड परिसरात अनेक वेळा आगीच्या घटना घडतात. तथापि प्रत्येक वेळी आगीत 100% मालमत्तेचे नुकसान होते. याचे कारण म्हणजे चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील दाट लोकवस्तीच्या कर्यात भागात किंवा जवळपास एकही अग्निशामक दलाचा बंब उपलब्ध नाही. या भागाला आगीच्या वेळी ४० किलोमीटर वरील गडहिंग्लज व चंदगड किंवा ३० किमी वरील बेळगाव येथील अग्निशामक बंब वर अवलंबून राहावे लागते. तिथून अग्निशामक बंब परिसरात येईपर्यंत सर्व खलास झालेले असते. या गोष्टीचा विचार करता एका अग्निशामक वाहनाची व्यवस्था कालकुंद्री, कुदनुर, कोवाड, निट्टूर, राजगोळी अशा ४० गावांना मध्यवर्ती ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment