मजरे कार्वे : येथे रणरणत्या उन्हात पेटत असलेले उसाचे फड
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे विद्युत वाहिनी तारांच्या स्पर्किंगने उसाच्या फडाना आग लागून आठ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर इतर शेतकऱ्यांचे फड जळण्यापासून वाचले.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शिनोळी औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचा एकमेकांना संपर्क आल्याने ठिणग्या उसाच्या फडात पडल्या. वाऱ्याचे झोताने आग भडकली. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. शेवटी शर्थीचे प्रयत्न करून ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये मनोहर महादेव तुपारे, सुबराव गुंडोपंत हारकारे, नारायण पांडुरंग गडकरी, तानाजी पांडुरंग गडकरी, बाळाराम गंगाराम गडकरी, शिवाजी लक्ष्मण गडकरी, जोतिबा लक्ष्मण गडकरी, प्रल्हाद ईश्वर गडकरी अश्या आठ शेतकऱ्यांच्या ३२ एकरातील ऊस जळून खाक झाला. आगीच्या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी श्रीमती कांबळे, वायरमन नवरंग कांबळे, ग्रामसेवक सुरेखा गिरीबुवा यांनी केला. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराचा ग्रामस्थांनी निषेध केला. जळीतग्रस्त शेतकऱ्यांना महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यातआलीआहे.
No comments:
Post a Comment