कालकुंद्री येथे गवत गंजीला आग लागून हजारोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2025

कालकुंद्री येथे गवत गंजीला आग लागून हजारोंचे नुकसान

 


कालकुंद्री: सी एल वृत्तसेवा

    कालकुंद्री (ता. चंदगड) येथे पिंजराच्या गवत गंजीला आग लागून सुमारे ३२ हजार रुपये किमतीचे पिंजर भस्मसात झाले. ही आग पिंजराच्या व्हळी (गंजी) वरून गेलेल्या विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे झाली लागली असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेचा पंचनामा ग्रामपंचायत व विद्युत वितरण कंपनी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.

  कालकुंद्री येथील शेतकरी रणजीत महादेव कांबळे यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी किटवाड रस्त्या शेजारी पिंजराची गंजी रचली आहे. या गंजीला काल दि ७ रोजी रात्री सव्वा बारा च्या सुमारास अचानक आग लागली. काल दिवसभर रणजीत व सुनील कांबळे या बंधूंनी मजुरीची माणसे, ट्रॅक्टर घेऊन गतवर्षीच्या गंजीवरच पुन्हा चार ट्रॉली पिंजर आणून रचले होते. गंजी व्यवस्थित रचून अकरा वाजताच्या सुमारास घरी गेले होते. रात्री सव्वा बारा च्या दरम्यान स्टॅन्ड परिसरात बसलेल्या काही लोकांना किटवाड रोड कडे आग भडकलेली दिसली. सर्वांनी धावत जाऊन पाहिले असता आगीने गवत गंजीला पूर्णपणे वेढले होते. या गंजीच्या जवळच बाबू कांबळे यांची गंजी आहे तरुणांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे ही जवळची गंजी वाचवण्यात यश आले. अन्यथा जवळची घरे व इतर गवतगंज्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा धोका होता. या गवत गंज्यांवरून  शेतकऱ्यांचा विरोध धडकन विद्युत कंपनीने खांबावरील तारा ओढल्या आहेत. वारा आल्यानंतर या तारा एकमेकांना चिकटल्याने पडलेल्या ठिणग्यांपासून गेल्या दोन-तीन वर्षात खाली आग लागण्याचे प्रकार घडले होते. तथापि शेजारी लोकांनी वेळीच पाहिल्यामुळे तेव्हा नुकसान टळले होते. तथापि काल लागलेली आग ही पिंजर नुकतेच आणून टाकल्याने ते बसले नव्हते फुललेले होते. परिणामी आगीने तत्काळ रौद्ररूप धारण केले.  संबंधित शेतकरी, शेजारी व गावातील काही तरुण ही आग विझवण्याचा रात्रभर प्रयत्न करत होते. तथापि त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

  दरम्यान आज सकाळी सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, सदस्या विजया कांबळे,  विज वितरण कंपनी कोवाड कार्यालयाचे सहाय्यक अभियंता संजय मगदूम, विद्युत कर्मचारी, कोतवाल शशिकांत सुतार, पोलीस पाटील संगीता कोळी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.  

   वीज वितरण कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या जागेवरून गेलेल्या विद्युत तारा रस्त्यावरून घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment