बुलेट चोरी करणारा चोरटा चंदगड पोलीसांनी २४ तासात केला जेरबंद - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2025

बुलेट चोरी करणारा चोरटा चंदगड पोलीसांनी २४ तासात केला जेरबंद

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
  चंदगड पोलीस ठाणे हद्दीतील अडकुर रोड व इब्राहिमपूर रोडवर बुलेट चोरी करणारा चोरटा चंदगड पोलिसांनी बुलेटसह जेरबंद केला. बुलेट चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकप चार चाकी वाहन सुद्धा यावेळी पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई गुन्हा नोंद झाल्यापासून चंदगड पोलिसांनी 24 तासाच्या आत केल्यामुळे पोलीस पथकाचे कौतुक होत आहे. गजाआड केलेल्या संशयितांची नावे गजानन विलास धुरी (वय, 32 वर्ष राहणार अडेली तालुका  वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग) व  रघुनाथ तुकाराम वाघे (वय 22 वर्षे राहणार अडेली तालुका  वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग) अशी आहेत. संशयित चोरट्यांवर भारतीय दंड विधान संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंद केला आहे.
   गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या काळ्या रंगाच्या रॉयल एनफिल्ड कंपनीच्या क्लासिक 350 सीसी बुलेट मोटरसायकल चोरीस गेल्याची नोंद झाल्यानंतर चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या सूचनेनुसार शोध पथक तयार करून रवाना करण्यात आले. पथकाने सीसीटीव्ही फुटेज पाहणी व पडताळणी करून विश्वसनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे कानूर खुर्द येथील एक इसम काळ्या रंगाची बुलेट गाडी नंबर प्लेट काढून फिरवत आहे. अशी बातमी मिळतात पथकाने तिथे जाऊन सापळा रचला. यात बुलेट फिरवणारा सहजगत्या अडकला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने दिनांक 24 मे 2025 रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अडकुर- इब्राहिमपूर रोडवर फार्म हाऊस वरून ही बुलेट गाडी चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर खातरजमा करून पोलिसांनी बुलेट गाडी चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकप हे चार चाकी वाहन दोन पंचा समक्ष ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली. या कामी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सदस्य राजिगरे, पोलीस नाईक देसाई, पोलीस शिपाई झाडे, पाटील व ईश्वर नावलगी यांनी कामगिरी यशस्वी रित्या पार पाडली.

No comments:

Post a Comment