पारगड येथील 'शिवराज्याभिषेक सोहळा' नियोजनासाठी कार्वे येथे रविवारी दि १ रोजी बैठक, उपस्थित राहण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2025

पारगड येथील 'शिवराज्याभिषेक सोहळा' नियोजनासाठी कार्वे येथे रविवारी दि १ रोजी बैठक, उपस्थित राहण्याचे आवाहन

 

पारगड येथील शिवराज्याभिषेक सोहळ्याची संग्रहित छायाचित्र.

कार्वे : सी एल वृत्तसेवा 

       किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे ६ जून २०२५ रोजी शिवराज्याभिषेक आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयात रविवार दिनांक १ जून २०२५ पण ‌लं‌‍ रोजी सकाळी १० वाजता व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

        गेल्या काही वर्षात ६ जून रोजी पारगड येथे शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन मजरे कार्वे, ग्रामस्थ मंडळ पारगड व गडहिंग्लज येथील शिवभक्त यांच्यामार्फत शिवराज्याभिषेक आनंद सोहळा हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पाडला जातो. या सोहळ्यासाठी दरवर्षी बहुतेक शिवभक्त पाच जून रोजी पारगड मुक्कामी दाखल होतात. ५ जून रोजी सायंकाळी  शिवभक्तांच्या उपस्थितीत गड पूजन, गोंधळ, शाहिरी कला, हलगी वादक, संगीत भजन असे अनेक कार्यक्रम पार पडतात तर सहा जून रोजी शिव पुतळा अभिषेक, गडावरून पालखी मिरवणूक, शोभायात्रा, मर्दानी खेळ प्रात्यक्षिके, शिवकलीन युद्ध कला प्रात्यक्षिके सादर करणे, याबरोबरच राज्याभिषेक मुख्य सोहळा व पूजन केले जाते. अशा विविध कार्यक्रमांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पारगडावरील भवानी मातेच्या मंदिरासमोर जागर होणार आहे. या शिवराज्याभिषेक आनंदोत्सव सोहळ्यामध्ये दरवर्षी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव, गोवा, कोकणासह विविध भागांतून  हजारो शिवभक्त उपस्थित राहतात. दरवर्षी या सोहळ्याचे स्वरूप बदलत असून शिवभक्तांची संख्या वर्षागणिक वाढत असल्याने सोहळ्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. त्यास अनुसरून १ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता महात्मा फुले विद्यालय मजरे कार्वे येथे व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी चंदगड, आजरा, गडहिंग्लज सह बेळगाव जिल्ह्यातून या बैठकीसाठी शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment