कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी इस्त्री वाले सदाशिव शंकर परीट (वय ७५) यांचे मंगळवार दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सुन, विवाहित दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी अजित परीट यांचे ते वडील होत.
४०-४५ वर्षांपूर्वी गावात तुटपुंज्या वैद्यकीय सुविधा असतानाच्या काळात धोबी काम करत असताना कालकुंद्री व कागणी या दोन गावातील कपडे घरोघरी जाऊन इस्त्री करण्यासाठी आणायचे. हे काम करता करता शासनाच्या मलेरिया/ हिवताप निर्मूलन मोहिम अंतर्गत अनेक वर्षे 'आरोग्य रक्षक' म्हणून त्यांनी गावात उत्कृष्ट सेवा बजावली होती. गावातील आबालवृद्धांच्या आरोग्याची आस्थेने चौकशी करून त्यांना शासनाकडून आलेली औषधे तत्परतेने पुरवत. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना त्या काळात ग्रामस्थ 'डॉक्टर' म्हणूनच संबोधायचे यातच त्यांच्या कार्याची पोहोच मिळते. सदू परीट यांच्या आकस्मिक निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment