बहुचर्चित 'शिव चातुर्य दिन- आग्रा ते राजगड 'गरुड झेप मोहीम' सायकल व पायी मशाल दौड १० व्या दिवशी पुण्यात दाखल, उद्या २७ रोजी किल्ले राजगड येथे पोहोचणार - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2026

बहुचर्चित 'शिव चातुर्य दिन- आग्रा ते राजगड 'गरुड झेप मोहीम' सायकल व पायी मशाल दौड १० व्या दिवशी पुण्यात दाखल, उद्या २७ रोजी किल्ले राजगड येथे पोहोचणार

 


चंदगड : श्रीकांत पाटील/ सी एल वृत्तसेवा 

   इतिहास आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सुरू असलेली बहुचर्चित शिव चातुर्य दिन 'आग्रा ते राजगड गरुड झेप मोहीम' सायकल व पायी मशाल दौंड आज पुणे जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथे तर आज मोहिमेच्या दहाव्या दिवशी सायंकाळी पुणे शहरात दाखल झाली.  कपटी औरंगजेबाच्या नजर कैदेतून अर्थात मगर मिठीतून आपल्या संयम, बुद्धी चातुर्य, शौर्य व धाडसाच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा एक थेंबही सांडता आपल्यासह युवराज छत्रपती संभाजी राजे व सोबतच्या मावळ्यांना सुखरूप शत्रूच्या मगर मिठीतून सोडवून आणले ही घटना घडली होती १७ ऑगस्ट १६६६ रोजी. या घटनेचे स्मरण म्हणून छत्रपतींचे पायदळ प्रमुख सरनोबत पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज ॲड मारुती(आबा) गोळे रा. पुणे यांनी सात वर्षांपूर्वी म्हणजे सन २०२० सालापासून शिव चातुर्य दिन - गरुड झेप मोहीम सुरू केली आहे. सात वर्षांपूर्वी ॲड मारुती गोळे यांनी केवळ एकट्याने सुरू केलेल्या या मोहिमेला दरवर्षी निरंतर अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. आग्रा येथे १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल व भरत गोगावले तर उत्तर प्रदेश चे कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय यांच्यासह अनेक आमदार, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार उपस्थित होते. (चंदगड पत्रकार संघ संचलित 'सी एल न्यूज पोर्टल' चॅनलवर या सोहळ्याचे दोन दिवस थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.)

 आग्रा येथून १७ ऑगस्ट रोजी सुरू होणारी गरुड झेप मोहीम २७ ऑगस्ट रोजी तब्बल १३१० किलोमीटरचे अंतर पार करून अकराव्या दिवशी स्वराज्याची तत्कालीन राजधानी राजगड येथे पोहोचते.  उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या चार राज्यांतील ७८ शहरे व गावे यातून जाणाऱ्या सायकल रॅली व पायी मशाल दौडीला दौड मार्गावर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जल्लोषी स्वागत होत आहे.

    आग्रा येथून निघालेल्या या रॅलीचा पहिला मुक्काम १७ ऑगस्ट रोजी ग्वालियर व त्यानंतर अनुक्रमे शिवपुरी, गुना, पाचौर, देवास, ठिकरी, नर्मदा-धुळे, चंदवाड, संगमनेर, भोसरी- पुणे या ठिकाणी झाला असून उद्या दि. २७ रोजी नरसापुर- राजगड येथे  यंदाच्या मोहिमेची समाप्ती होणार आहे. अकरा दिवस सुरू असलेल्या या मोहिमे त सहभागी सायकलपटू व अन्य मावळ्यांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण व संध्याकाळचे जेवण देण्यासाठी मार्गावरील गावांतील शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे मोहिमेतील मावळ्यांची सेवा दिली. राजकीय व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी योगदान दिले.

    गेली सात वर्षे शिवप्रेमींच्या आर्थिक व अन्य स्वरूपातील  देणगीतून सुरू आहे. तथापि मोहिमेसाठी येणारा खर्च हा अवाढव्य असल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून या मोहिमेसाठी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवप्रेमीं मधून होत आहे.


  चंदगड परिसरातील आठ किल्ल्यांवरील पाण्याने आग्रा येथील शिव पुतळ्यास जलाभिषेक-

     या मोहिमेंतर्गत आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जलाभिषेक करण्यात आला. यासाठी चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड, कलानिधीगड, महीपाळगड, गंधर्वगड, तसेच परिसरातील सामानगड राजहंसगड वल्लभगड साखळी आदी आठ किल्ल्यांची वरील जल नेण्यात आले होते. चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते जलपूजन व शुभेच्छा कार्यक्रमानंतर आग्रा येथे हे जल पत्रकार श्रीकांत पाटील (कालकुंद्री), संपत पाटील (नांदवडे), चेतन शेरेगार (चंदगड), संदीप तारीहाळकर (कागणी),  दीपक गावडे (न्हावेली) यांच्यासह ६७ वर्षीय राजाराम पाटील (ढोलगरवाडी, हे १३१० किमी पायी दौड मोहिमेत सहभागी आहेत), सुखदेव भातकांडे (कालकुंद्री), प्रकाश हेब्बाळकर (कुदनूर) आदींनी थेट आग्रा येथे प्रत्यक्ष जाऊन पोहोच करत आपला महत्त्वपूर्ण सहभाग दाखवला. 

    या कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा डंका ३६० वर्षानंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेश राज्यातील औरंगजेब बादशहाची तत्कालीन राजधानी आग्र्यात घुमला आहे. शिव चातुर्य दिन गरुड झेप मोहीम कार्यक्रमामुळे उत्तर प्रदेश सरकारचे लक्ष वेधल्यामुळेच औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना ९९ दिवस नजर कैदेत ठेवलेल्या आग्र्यातील 'कोठी मीना बाजार' परिसरातील जागा देऊन या ठिकाणी छत्रपतींचे भव्य स्मारक महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने बांधण्यास अनुमती दिली आहे. लवकरच हे स्मारक  आग्रा येथे उभारले जाईल अशी ग्वाही १७ ऑगस्ट २०२६ रोजी आग्रा येथील लाल किल्ल्यासमोर झालेल्या गरुड झेप मोहीम शुभारंभ प्रसंगी दोन्ही राज्यातील मंत्र्यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment