ऊस पीक हे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा; आधुनिकतेची जोड देणे काळाची गरज, ओलम कारखान्याच्या वतीने कोवाड येथे ‘उन्नती शेतकरी मेळावा’ उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2026

ऊस पीक हे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा; आधुनिकतेची जोड देणे काळाची गरज, ओलम कारखान्याच्या वतीने कोवाड येथे ‘उन्नती शेतकरी मेळावा’ उत्साहात

 


कोवाड / सी एल वृत्तसेवा - संजय पाटील

ऊस पीक हे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे महत्त्वाचे साधन असून, बदलत्या काळानुसार ऊस शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य नियोजन, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास उत्पादन खर्च कमी करून उत्पादनात वाढ करता येते, असा सूर कोवाड येथे झालेल्या ‘उन्नती शेतकरी मेळाव्यात’ उमटला.

ओलम (हेमरस) कारखाना, राजगोळी खुर्द-चन्नेहट्टी, ता. चंदगड, यूपीएल व नेटाफिम यांच्या संयुक्त विद्यमाने कोवाड येथील राजयोग सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे बिझनेस हेड टी. कन्नम होते. प्रमुख पाहुणे म्हणून ओलम अँग्रीचे युनिट हेड एस. राधाकृष्णन व केन हेड सुधीर पाटील उपस्थित होते.

यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, शाश्वत ऊस उत्पादन, पीक संरक्षण तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

ठिबक सिंचनातून पाण्याची बचत व उत्पादनात वाढ

नेटाफिम इंडिया शुगरकेनचे तज्ज्ञ मार्गदर्शक अरुण देशमुख यांनी ‘ऊस पिकामध्ये ठिबक सिंचनाची गरज व महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ऊस पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. पारंपरिक पद्धतीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. ठिबक सिंचनामुळे पाणी थेट मुळांच्या कार्यक्षेत्रात देता येते. त्यामुळे पाण्याची बचत होण्याबरोबरच खतांचा कार्यक्षम वापर करता येतो. ठिबकद्वारे फर्टिगेशन केल्यास पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये देता येतात. परिणामी ऊसाची वाढ एकसारखी होऊन उत्पादन व साखर उताऱ्यात सुधारणा होण्यास मदत होते.

शाश्वत ऊस विकासासाठी एकात्मिक नियोजन आवश्यक

यूपीएल शुगरकेन क्रॉप मॅनेजर अमोल आंधळे यांनी ‘शाश्वत ऊस विकास प्रकल्प’ या विषयावर मार्गदर्शन केले. ऊस उत्पादन वाढविण्यासाठी केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता जमिनीची सुपीकता टिकवणे, पाण्याचा काटकसरीने वापर, योग्य बेणे निवड, संतुलित खत व्यवस्थापन आणि वेळेवर पीक संरक्षण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन स्वीकारल्यास उत्पादन खर्च कमी करून उत्पादनाची गुणवत्ता वाढविता येते. भविष्यातील ऊस उत्पादनासाठी शाश्वत शेती हीच प्रमुख गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोग-किडींचे वेळीच व्यवस्थापन करा

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर यांनी ‘ऊस पिकावरील महत्त्वाचे रोग, कीड व त्यावरील उपाय’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ऊस पिकावर रोग-किडींचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून प्राथमिक लक्षणे दिसताच रोग किंवा किडीची अचूक ओळख करावी, असे त्यांनी सांगितले.

निरोगी बेणे, शेताची स्वच्छता, संतुलित खत व्यवस्थापन तसेच जैविक व रासायनिक उपायांचा गरजेनुसार वापर केल्यास रोग-किडींचे प्रभावी नियंत्रण करता येते. अनावश्यक औषधांचा वापर टाळून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच फवारणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

एआय तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीला आधुनिक दिशा

फायलो अँग्री हॉक टेक्नॉलॉजीचे विपणन व्यवस्थापक विशालकुमार मिरजे यांनी ‘एआय तंत्रज्ञान आणि ऊस शेती’ या विषयावर मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये मोठे बदल घडून येत असून, पिकाची वाढ, रोग-किडींची लक्षणे, हवामानातील बदल, पाण्याची गरज आणि उत्पादन व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना वेळेवर माहिती मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

भविष्यात ऊस शेती अधिक अचूक, कमी खर्चाची व उत्पादनक्षम करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कंपनीचे विविध उपक्रम

यावेळी ओलम अँग्रीचे बिझनेस हेड टी. कन्नम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादन खर्चातील बचत आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कंपनीकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक ऊस शेतीचे तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, पाणी व खत व्यवस्थापन तसेच रोग-किड नियंत्रणाबाबत उपयुक्त माहिती मिळत असून त्याचा उपयोग शेतकरी नक्कीच ऊस उत्पादन वाढीसाठी करतील अशी आशा केन हेड सुधीर पाटील यांनी व्यक्त केली

यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांमध्ये नितीन पाटील व प्रमिला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल पाटील व जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ओलम (हेमरस) कारखान्याचे अधिकारी, यूपीएल, नेटाफिम व फायलो अँग्री हॉक टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी तसेच परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी बरोबरच महिला वर्गाची उपस्थिती ही मोठ्या संख्येने होती. शेवटी नामदेव पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment