शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बी जी खाडे (कागणी) यांचा पनवेल येथे सेवा पूर्ती गौरव संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2025

शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बी जी खाडे (कागणी) यांचा पनवेल येथे सेवा पूर्ती गौरव संपन्न

  

प्रा. बी. जी. खाडे

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. बी. जी. खाडे (कागणी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हे नियत वयोमानानुसार ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई व पनवेलच्या सन १९९३ ते २०२५ च्या प्रा. खाडे यांच्या माजी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथे पार पडला. अध्यक्षस्थानी पनवेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, माजी सहसंचालक नांदेड विभाग तसेच नांदेड विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एस. एम. सोनवणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश भोसले उपसंचालक जनगणना संचालनालय महाराष्ट्र व ग्रंथ मंत्रालय भारत सरकार हे उपस्थित होते. यावेळी शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई व पनवेलच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रा. खाडे यांच्या विषयी लिहिलेला लेख संग्रह असलेला 'ऋणानुबंध : प्रोफेसर डॉ. बी. जी. खाडे गौरव ग्रंथ' चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रा. बी. जी. खाडे यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळा प्रसंगी डॉ खाडे गौरव ग्रंथाचे प्रकाशन करताना मान्यवरांसोबत डॉ. खाडे व सौ खाडे

        कागणी येथील सर्वसामान्य अतिशय गरीब कुटुंबातील असलेल्या खाडे यांचे पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद मराठी विद्या मंदिर कागणी येथे तर सहावी ते दहावी माध्यमिक शिक्षण श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथे झाले. जिद्द, चिकाटी व प्रयत्नवादी वृत्ती च्या जोरावर खाडे यांनी अकरावी नंतरचे शिक्षण 'कमवा व शिका' या योजनेतून पूर्ण केले. त्यांनी एम. ए., एम. एड., एम. फिल, सेट (मराठी), सेट (शिक्षण शास्त्र), पीएचडी पर्यंत शिक्षण घेतले. बीए. ला  मराठी विषयात शिवाजी विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान त्यांनी पटकावला असा बहुमान मिळवणारे चंदगड तालुक्यातील ते पहिलेच विद्यार्थी ठरले होते. त्याबद्दल त्यांना कै. वि. स. खांडेकर व पूज्य स्वामी स्वरूपानंद पारितोषिके देऊन गौरवण्यात आले होते. ते राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीधारकही होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग १ अधिकारी (प्रशिक्षण शाखा) या पदावर निवड झाल्यानंतर शासकीय अध्यापक विद्यालय मुंबई व पनवेल या दोन्ही ठिकाणी ३२ वर्षे अधिव्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, आणि प्राध्यापक या पदांवर कार्य केले. तसेच तीन वर्षे त्यांनी शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल व शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई या ठिकाणी प्राचार्य पदावर केलेले कार्य उल्लेखनीय ठरले होते. शिक्षण क्षेत्रात त्यांची एकूण सेवा ३५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्य मुंबई व पनवेल येथील सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित केला होता. यावेळी दोन्ही महाविद्यालयांचे आजी-माजी प्राध्यापक, कर्मचारी वर्ग, आजी माजी  प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment