आजरा तहसीलसमोर बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन, वन्य प्राण्यांबाबत ठोस उपाय योजनांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2025

आजरा तहसीलसमोर बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन, वन्य प्राण्यांबाबत ठोस उपाय योजनांची मागणी



आजरा : गोपाळ गडकरी /सी एल न्यूज

       बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण वनविभागाने तत्परतेने करावे या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची पूर्वसूचना वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पत्र देऊन बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिलेली होती. तरीही वनपरिक्षेत्र अधिकारी आजरा या आंदोलनाला उपस्थित राहिले नाहीत.‌ त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून वनपाल शकील मुजावर व भरत निकम यांना पाठवले होते. त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा जोरदार निषेध केला. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना फोनवरून त्यांच्या अनुपस्थिती बद्दल खड्या शब्दात जाब विचारला. याशिवाय दोन्ही उपस्थित वनपालांनाही बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. 

    बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्यामुळे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा उपवनसंरक्षक यांच्याशी चर्चा करण्याचा आग्रह धरला. त्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही असे घोषित केले. 

      “तालुक्याची कमिटी बनवून कोल्हापूरला जाऊन जिल्हा उपसंरक्षकांची भेट घेऊया”, अशी भूमिका वनविभागाच्या वतीने मांडण्यात आली. परंतु या भूमिकेला बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला व जिल्हा उपवनसंरक्षकांनी आजऱ्यामध्ये येऊन येथील शेतकऱ्यांची भेट घेतली  पाहिजे असे सांगितले. कारण गव्यांचे हल्ले आजऱ्यामध्ये होत आहेत, येथील शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे उपवनसंरक्षक यांनी आजरा येथेच यावे असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले. 

      यानंतर जिल्हा उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्याशी बोलल्यानंतर २६ जून २०२५ रोजी वनविभाग व बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांची समोरासमोर चर्चा घडवून आणली जाणार आहे. असे उपस्थित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसे रितसर पत्र वनविभागाने बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केल्यानंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.‌ 

    परंतु यानंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुढील शृंखलाबद्ध आंदोलनाचे निवेदन सुद्धा लागलीच वनपरिक्षेत्र अधिकारी तथा तहसीलदार यांना सुपूर्द केले. जोपर्यंत वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा प्रश्न कायमचा सुटत नाही तोपर्यंत आंदोलन कधीही मागे घेतले जाणार नाही. असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिला. 

    यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, ॲड. विद्या त्रिरत्ने, किरण केके, राहुल मोरे, अमित सुळेकर, दशरथ सोनुले, संदीप दाभिलकर, काशिनाथ मोरे, शिवाजी गुरव, मसणू सुतार, द्वारका कांबळे, नाहिदा महागोंडे, नाझिया शेख, नितीन राऊत, सूर्यकांत कांबळे, दत्तराज पाटील,  इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment